आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या लिलावात पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क ही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी जोडी हिट ठरू शकते, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने व्यक्त केला आहे. कमिन्स आणि स्टार्कवर १४ कोटींहून अधिकची बोली लावली जाऊ शकते, असा अंदाज अश्विनने व्यक्त केला आहे.
अश्विनला वाटते की, २०२३च्या विश्वचषक विजयानंतर फ्रँचायझी स्टार्क आणि कमिन्स या दोघांवर खूप पैसा खर्च करू शकतात. पंजाब किंग्जने सोडलेला अष्टपैलू शाहरुख खानलाही १० ते १४ कोटी रुपयांच्या दरम्यान बोली लागू शकते, असे त्याने सांगितले. अश्विनने सांगितले की, न्यूझीलंडचा रचिन रवींद्रवर ४ ते ७ कोटी रुपयांची बोली लागण्याची अपेक्षा आहे, असं अश्विनने सांगितले.
अश्विन हर्षल आणि कोएत्झीबद्दल काय म्हणाला?
अश्विननेही वेगवान गोलंदाज हर्षल पटेलसाठी बोली लागण्याची आशा व्यक्त केली. आरसीबीच्या या माजी वेगवान गोलंदाजासाठी ७ ते १० कोटी रुपयांची बोली लावली जाऊ शकते, असे तो म्हणाला. भारताचा दिग्गज फिरकीपटू म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीलाही हर्षल पटेलइतकीच रक्कम मिळू शकते. त्याचबरोबर अश्विनला विश्वास आहे की, वेस्ट इंडिजचा टी-२० कर्णधार रोव्हमन पॉवेलला ४ ते ७ कोटी रुपये मिळतील.
अश्विनचे ट्रॅव्हिस हेडबाबत धक्कादायक विधान
विश्वचषकाचा हिरो ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडबद्दल अश्विनने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. अश्विनला विश्वास आहे की हेडला ४ कोटींपेक्षा जास्त किंमत मिळणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवला ४ ते ७ कोटी रुपयांना विकत घेतले जाऊ शकते. यावेळी आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. पहिल्यांदाच हा लिलाव भारताबाहेर होणार आहे. दुबईत होणाऱ्या लिलावात ३३३ खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. एकूण ७७ जागा रिक्त आहेत. त्यापैकी ३० स्लॉट विदेशी खेळाडूंचे आहेत.