Join us  

CWG 2022:ऑस्ट्रेलियाविरूद्ध राधा यादवने फिल्डिंगमध्ये केली कमाल; ICC नेही ठोकला सलाम 

भारतीय महिला क्रिकेट संघाला राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 5:39 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian Women Cricket Team) राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022 ) च्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. कांगारूच्या संघाने भारतीय महिलांना ९ धावांनी पराभूत केले मात्र या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपल्या फिल्डिंगने अनेकांची मने जिंकली. राधा यादवने धावबाद करून सर्वांचे लक्ष वेधले तर दीप्ती शर्माने एका हाताने सुपरमॅन पद्धतीने झेल घेऊन आपली ताकद दाखवून दिली. राधा यादवने ज्या चतुराईने कर्णधार मेग लॅनिंगला धावबाद केले, ते पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (ICC) देखील तिची फॅन झाली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या संघाची कर्णधार लॅनिंग २६ चेंडूवर ३६ धावा करून खेळत होती. दरम्यान, ती नॉन स्ट्रायकर एंडवर असताना राधाने तिला अतिशय चालाकीने धावबाद केले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ११ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा सर्व प्रकार घडला. फलंदाजी करत असलेल्या बेथ मूनेने सरळ चेंडू मारला आणि थेट राधाच्या हातात गेला. नॉन स्ट्रायकर एंडवर असलेली कर्णधार धाव काढण्यासाठी पुढे सरसावली असता राधाने अतिशय चालाकीने तिला बाद केले. लक्षणीय बाब म्हणजे तिला धावबाद दिल्यानंर देखील काही खेळाडूंचा याच्यावर विश्वास बसत नव्हता. 

राधा यादवचे शानदार क्षेत्ररक्षण ICC ने याचा व्हिडीओ शेअर करत म्हटले, "राधा यादवची फिल्डिंग एका शब्दात सांगा?", सोशल मीडियावरील युजर्संनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुवर्ण पदकाच्या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाने २० षटकात १६१ धावा करून भारतीय संघाला १६२ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ १९.३ षटकात १५२ धावांवर सर्वबाद झाला आणि ९ धावांमुळे सुवर्ण पदकाला मुकला. 

भारताच्या हातून निसटले सुवर्ण भारताला शेवटच्या १२ चेंडूंत विजयासाठी १७ धावा हव्या होत्या. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राधा यादव धावबाद झाली. दीप्ती शर्मा १३ धावांवर मेगन शूटच्या गोलंदाजीवर LBW झाली. तेव्हा भारताला ९ चेंडूंत १३ धावा हव्या होत्या. कनकशन खेळाडू म्हणून आलेल्या यास्तिका भाटीयाची निवड झाली होती. तानिया भाटीयाला विकेटकिपरींग करताना दुखापत झाली होती. शेवट्या ६ चेंडूंत भारताला सुवर्ण जिंकण्यासाठी ११ धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर यास्तिकासाठी मेघनाने स्वतःची विकेट टाकली. सामना ४ चेंडू १० धाव असा चुरशीचा झाला. यास्तिका पुढच्याच चेंडूवर LBW झाली अन् भारताचा पराभव निश्चित झाला. भारताचा संपूर्ण संघ १५२ धावांत तंबूत परतला. त्यामुळे भारतीय महिलांच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

 

टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारतआॅस्ट्रेलियाआयसीसीटी-20 क्रिकेटभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयसुवर्ण पदकस्मृती मानधना
Open in App