अँटिग्वाच्या पहिल्या कसोटीत भारत विजयाचा दावेदार होताच, पण सामन्याच्या चौथ्या दिवशी विंडीजने ज्याप्रकारे नांगी टाकली त्यामुळे विदेशात सर्वांत मोठा विजय साकार होऊ शकला. पहिल्या दिवशी भारताने झटपट तीन गडी गमावल्याचा अपवाद वगळता विराट कोहली व सहकाऱ्यांनी नंबर वन कसोटी संघाप्रमाणे वर्चस्वपूर्ण खेळ केला.
चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्यासाठी हा सामना सोपा नव्हता. विशेषत: दोन वर्षांहून अधिक काळ तुम्ही कसोटी शतक नोंदविले नसेल, तर फलंदाजी अधिक आव्हानात्मक होते. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचा विश्वास सार्थकी लावून अजिंक्यने धावा काढल्या. अजिंक्यची क्षमता व त्याच्या कर्तृत्वाला अद्यापही पुरेसा न्याय मिळाला, असे वाटत नाही. हनुमा विहारीचेही कौतुक करावे लागेल. गतवर्षी इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळाल्यापासून हा खेळाडू मोकळेपणाने खेळताना कुठलीही अनावश्यक जोखीम पत्करत नाही. याउलट लोकेश राहुलने दोन्ही डावात निराशा केली. त्याच्यात कमालीचे कौशल्य आहे, पण गेल्या दीड वर्षांपासून चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या खेळीत केलेले नाही.
हा सामना भारतीय वेगवान गोलंदाजांनी गाजवला. इशांतचा मारा अप्रतिम होता, तर मोहम्मद शमीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना वारंवार त्रास दिला. दुसरीकडे जसप्रीत बुमराहने सर्वस्व पणाला लावून मारा करत अनेकांची वाहवा मिळविली. फलंदाजांना यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडणारे चेंडू टाकणे हे बुमराहचे वैशिष्ट्य आहे.
विंडीजची दुरवस्था पाहून समालोचन कक्षात बसलेले सर विव्हियन रिचर्ड्स व इयान बिशप यांची उद्विग्नता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. कधी काळी ‘दादा’ असलेला विंडीज संघ अशा गर्तेत सापडल्याचे माझ्यासह सर्वांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे.- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण