दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहलीनेआयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये दुसरे स्थान कायम राखले आहे आहे तर कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणेने पाच स्थानांची प्रगती करताना अव्वल १० मध्ये स्थान मिळविले आहे. रहाणेने मेलबोर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ११२ व नाबाद २७ धावांची खेळी करीत भारताला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तो मानांकनामध्ये पाचव्या स्थानी पोहोचला होता.
ऑफ स्पिनर आर. अश्विनने दोन स्थानांची प्रगती करीत सातवे स्थान गाठले आहे तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नवव्या स्थानी पोहोचला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ५७ धावांच्या खेळीसह तीन बळी घेणारा रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी कायम आहे. तो जेसन होल्डरच्या तुलनेत सात मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. फलंदाजीमध्ये तो ३६ व्या तर गोलंदाजीमध्ये १४ व्या स्थानी पोहोचला आहे.
एमसीजी कसोटीत पदार्पण करणारे शुभमन गिल ७६ व्या व मोहम्मद सिराज ७७ व्या स्थानी आहे. चेतेश्वर पुजाराची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो १० व्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क पाचव्या स्थानी दाखल झाला आहे. तर फलंदाजीमध्ये मॅथ्यू वेड अव्वल ५० मध्ये दाखल झाला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला पिछाडीवर सोडत अव्वल स्थान गाठले आहे. स्मिथची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. पाकिस्तानच्या फवाद आलमने ८० स्थानांची प्रगती करताना १०२ वे स्थान गाठले आहे तर मोहम्मद रिजवान कारकिर्दीतील सर्वोत्तम ४७ व्या स्थानी आहे.