मेलबोर्न : ॲडिलेड कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर बॉक्सिंग डे कसोटीत अजिंक्य रहाणेचे शतक देशाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत महत्त्वांच्या खेळींपैकी एक असेल, असे मत महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाहुण्या संघाने दुसऱ्या कसोटीत शानदार पुनरागन केले. भारताने मेलबोर्नमध्ये मालिकेत बरोबरी साधण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
गावसकर म्हणाले, ‘माझ्या मते, हे शतक भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या शतकांपैकी एक असेल.’ गावसकर यांनी म्हटले की, या खेळीमुळे यजमान संघाला संदेश मिळाला आहे की, मालिकेतील पहिल्या लढतीत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही भारतीय संघ सहज गुडघे टेकणार नाही.