अहमदाबाद : गेल्या काही मालिकांमध्ये अपयशी ठरलेल्या अजिंक्य रहाणेने रणजी क्रिकेट स्पर्धेतील सामन्याद्वारे आपला फॉर्म मिळवताना सौराष्ट्रविरुद्ध दमदार नाबाद शतक झळकावले. रहाणेने २५० चेंडूंमध्ये १४ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०८ धावा केल्या. त्याने सर्फराझ खानसोबत चौथ्या गड्यासाठी नाबाद २१९ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवसअखेर सौराष्ट्रविरुद्ध ८७ षटकांमध्ये ३ बाद २६३ धावा उभारल्या.
गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी ठरलेल्या रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना फॉर्म मिळवण्यासाठी रणजी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला होता. त्यानुसार रहाणे मुंबईकडून, तर पुजारा सौराष्ट्रकडून मैदानावर उतरले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईची ३ बाद ४४ धावा अशी अवस्था झाली होती. येथून रहाणे-सर्फराझ यांनी मुंबईला सावरले. सर्फराझने २१९ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या आहेत. दोघांनी मुंबईला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढत संघाची स्थिती भक्कम केली. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट, चेतन सकारिया आणि चिराग जानी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी स्पर्धेच्या आपल्या सलामीच्या लढतीत उत्तर प्रदेशला पहिल्यादिवशी ७ बाद २६८ धावांवर रोखले. उमेश यादव, आदित्य ठाकरे आणि आदित्य सरवटे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने सावध सुरुवात केली. मात्र १२ व्या षटकापासून विदर्भाने उत्तर प्रदेशवर फास आवळला. केवळ २४ धावांमध्ये ४ जबर धक्के देत विदर्भने उत्तर प्रदेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. विदर्भ एकहाती वर्चस्व राखणार, असे दिसत असताना अक्षदीप नाथ आणि रिंकू सिंग यांनी पाचव्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी करत उत्तर प्रदेशला सावरले.सरवटेने रिंकूला बाद करत ही जोडी फोडली.
पवन शाहने महाराष्ट्राला सावरले
रोहतक : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त पदार्पण केलेल्या सलामीवीर पवन शाहच्या नाबाद दीडशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतरही आसामविरुद्ध पहिल्या दिवराअखेर समाधानकारक मजल मारली. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने ९० षटकांत ५ बाद २७८ धावा केल्या. पवनने २७२ चेंडूंत १५ चौकार व एका षटकारासह नाबाद १६५ धावांची एकाकी लढत दिली. नाणेफेक जिंकून आसामने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत महाराष्ट्राची फलंदाजी उद्ध्वस्त केली. यश नाहर (४), राहुल त्रिपाठी (२), कर्णधार अंकित बावणे (२७), नौशाद शेख (२८) आणि विशांत मोरे (१६) हे अपयशी ठरले. मात्र, एक बाजू लावून धरलेल्या पवनने आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात महाराष्ट्राला सावरले. दिव्यांग हिंगणेकरने ७८ चेंडूंत नाबाद ३६ धावांची खेळी करत पवनला चांगली साथ दिली. मुख्तार हुसैनने ६१ धावांत ३ बळी घेत महाराष्ट्राला धक्के दिले.