अफगाणिस्तान संघातील स्टार सलामीवीर बॅटर रहमनुल्लाह गुरबाझ याने शतकी खेळीसह धमाकेदार कामगिरीची नोंद केलीये. ज्या ज्या वेळी त्याची बॅट तळपते त्या त्या वेळी अफगाणिस्तानच्या संघ विजयी ठरला आहे. हा खेळाडू अफगाणिस्तानचा ट्रम्प कार्डच आहे. पुन्हा एकदा त्यानं आपल्या बॅटिंगची खास झलक दाखवून दिली. त्यानं केलेली शतकी खेळी संघासाठी उपयुक्त ठरलीच. याशिवाय त्याने खास विक्रमही आपल्या नावे केल्याचे पाहायला मिळाले.
गुरबाझनं किंग कोहलीचा विक्रम मोडला
शारजाहच्या मैदानात रंगलेल्या बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात रहमनुल्लाह गुरबाझच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. या खेळीसह एका डावात त्याने रन मशिन विराट कोहलीचा विक्रम तर मोडलाच पण क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर या नावाने क्रिकेटमध्ये वेगळी छाप सोडणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही त्याने मागे टाकले आहे.
सचिन तेंडुलकरसह क्विंटन डिकॉकची बरोबरी
रहमनुल्लाह गुरबाझनं २३ वा बर्थडे साजरा करण्यापूर्वी वनडेत ८ वे शतक झळकावत मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेट किपर बॅटर क्विंटन डिकॉक यांची बरोबरी केलीये. या दोघांनी २२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ८ शतके झळकावली होती. विराट कोहलीनं वयाच्या २२ व्या वर्षी वनडेत ७ शतक झळकावली होती. आठव्या शतकासह गुरबाझनं त्याचा विक्रम मोडित काढला आहे.
असा पराक्रम करणारा सर्वात युवा बॅटरच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे गुरबाझ
बांगलादेश विरुद्धच्या शतकी खेळीसह रहमनुल्लाह गुरबाझ हा क्रिकेट जगतातील दुसरा खेळाडू ठरला ज्याने कमी वयात वनडेत ८ शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. क्विंटन डिकॉकनं २२ वर्षे ३१२ दिवस वय असताना वनडेत ८ शतके झळकावली होती. रहमनुल्लाह गुरबाझनं २२ वर्षे ३४९ वय असताना हा पल्ला गाठला आहे. सचिन तेंडुलकरनं २२ वर्षे आणि ३५७ दिवस या वयात ८ वनडे शतके झळकावली होती. विराट कोहलीनं २३ वर्षे आणि २७ वयात ८ वनडे शतके झळकावली होती.
कमी डावात वनडेत ८ शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरा
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ८ शतके झळकावण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावे आहे. दक्षिण आफ्रिकेच्या माजी सलामीवीरानं वनडेत ४३ डावात ८ शतके झळकावली होती. या यादीत पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याने ४४ डावात ८ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहेय रहमनुल्लाह गुरबाझनं ४६ डावात हा पल्ला गाठला आहे.