Join us  

IPL 2022 : Hardik Pandya च्या गुजरात टायटन्सने Suresh Raina ला ठेंगा दाखवला; जेसन रॉयच्या जागी अफगाणिस्तानच्या खेळाडूला देणार संधी

इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने वैयक्तिक कारण सांगून आयपीएलमधून माघार घेतली. सततच्या बायो बबलमुळे आलेल्या थकव्याचं कारण देत जेसन रॉयनं ही माघार घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 4:41 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्स ( Gujarat  Titans) संघाला IPL 2022 सुरू होण्यापूर्वीच धक्का बसला होता. इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने वैयक्तिक कारण सांगून आयपीएलमधून माघार घेतली. सततच्या बायो बबलमुळे आलेल्या थकव्याचं कारण देत जेसन रॉयनं ही माघार घेतली. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक लक्षात घेता कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने त्याला २ कोटींच्या मुळ किंमतीत ताफ्यात दाखल करून घेतले होते.

जेसन रॉयच्या माघारीनंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) गुजरात टायटन्सची डोकेदुखी वाढली होती. नेटिझन्सनी तेव्हा Mr IPL सुरेश रैना ( Suresh Raina) याला करारबद्ध करावे अशी मागणी उचलून धरली. CSK ने सुरेश रैनाकडे लिलावात पाठ फिरवली होती. त्यात गुजरातच्या खेळाडूने माघार घेतल्यानंतर रैनाला संधी मिळेल, असे स्वप्न चाहत्यांना पडू लागले. पण, हाती आलेल्या वृत्तानुसार गुजरात टायटन्सने सुरेश रैनाच्या नावाचा विचारच केला नाही. ते आता अफगाणिस्तानच्या रहमनुल्लाह गुरबाज ( Rahmanullah Gurbaz) याला करारबद्ध करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. गुरबाजने त्याच्या इंस्टास्टोरीवर ही पोस्ट केली आहे, परंतु गुजरात टायटन्सकडून अद्याप तसे जाहीर करण्यात आलेले नाही. 

२०१७मध्ये मिस ऐनक नाइट्स संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गुरबाजने विविध ट्वेंटी-२० लीगमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. तो खुल्ना टायटन्स, बार्बाडोस ट्रायडंट्, मुलतान सुलतान, इस्लामाबाद युनायटेड आणि जाफना किंग्स आदी संघांकडून खेळला आहे. २० वर्षीय खेळाडूने अफगाणिस्तानसाठी १८ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत   ५३१ धावा केल्या आहेत. गुरबाज गुजरात टायटन्सकडून खेळणार हे निश्चित झाल्यास तो या फ्रँचायझींतील तिसरा अफगाणिस्तानी खेळाडू ठरेल. गुजरातने आधीच राशिद खान व नूर अहमद यांना करारबद्ध केले आहे. 

सुरेश रैनाची आयपीएलमधील कामगिरीसुरेश रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रैना चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली ( ६२८३), रोहित शर्मा ( ५७८४) व शिखर धवन (५६११) हे आघाडीवर आहेत.  

गुजरात टायटन्सच्या सूत्रांनी Timesnow ला सांगितले की, ''सुरेश रैना गुजरात टायटन्सच्या ताफ्यात येत नाहीय. रॉयच्या रिप्लेसमेंटसाठी त्याच्या नावाचा विचारही केलेला नाही.'' 

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्सहार्दिक पांड्यासुरेश रैनाअफगाणिस्तान
Open in App