भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने सर्वांना अचंबित करणारी कामगिरी करून दाखवली. उपांत्य फेरीच्या अगदी जवळ हा संघ पोहोचला होता, परंतु काही अंशी अन्य संघ भारी पडले. अफगाणिस्तान व भारताचे मैत्रीपूर्ण नाते आहे आणि त्यामुळेच अफगाण खेळाडूंना भारतीय प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेले आपण पाहिले. त्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूने मायदेशी जाताजाता भारतीयांची मन जिंकणारी कृती केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानने नेदरलँड, श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड या माजी वर्ल्ड कप विजेत्या संघांचा पराभव केला.
स्वप्नवत प्रवासाला तात्पुरती विश्रांती! अफगाणिस्तानची रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपपर्यंतची 'क्रांती'
अहमदाबादमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेकडून ५ गडी राखून हरला होता. या पराभवासह अफगाण संघाचा या स्पर्धेतील प्रवास संपला. पराभवानंतर संघाचा स्टार खेळाडू रहमनुल्लाह गुरबाज याने मन जिंकणारी कृती केली. मध्यरात्री फूटपाथवर झोपलेल्या लोकांना तो शांतपणे मदत करताना दिसला आणि आर्थिक मदत करून त्याने त्यांनी दिवाळी गोड केली.
त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विश्वचषक प्रवास संपल्यानंतर तो रात्री ३ वाजता अहमदाबादच्या रस्त्यावर पोहोचला आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांजवळ शांतपणे पैसे ठेवले. गुरबाजने वर्ल्ड कपमध्ये ९ सामन्यांत दोन अर्धशतकांसह एकूण २८० धावा केल्या. त्याने इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतके झळकावली.