Rahul Dravid on Virat Kohli Room Video Leak: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला अलीकडेच पर्थमधील एका हॉटेलमध्ये विचित्र घटनेचा सामना करावा लागला. एका चाहत्याने त्याच्या हॉटेल रूममध्ये घुसून रूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. विराट कोहलीच्या पर्थ हॉटेलमधील रुमचा व्हिडिओ लीक झाल्यामुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही संतापला. या घटनेवर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आज तीव्र प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली. बांगलादेश विरूद्धच्या सामन्याआधी राहुल द्रविडने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याने यावर मत व्यक्त केले.
"पर्थमध्ये विराट कोहली संदर्भातील गोपनीयतेचा भंग झाला ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कारण हॉटेल रूम ही त्यांची वैयक्तिक जागा असते. तिथे हे भारतीय क्रिकेटपटू लोकांच्या नजरेपासून दूर असतात. पर्थमधील क्राउन हॉटेलच्या हाउसकीपिंग स्टाफच्या एका सदस्याने कोहलीच्या खोलीचे शूटिंग केले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. यावर कोहलीनेही नाराजी व्यक्त केली होती. हे निश्चितच निराशाजनक आहे. विराटच नाही तर कोणाच्याही बाबतीत असे घडलेले बरोबर नाही. अशी घटना घडणे अतिशय वाईट आहे. हॉटेल रूममध्ये घुसून तेथील गोष्टींचे शूटिंग काढणे आणि ते सोशल मीडियावर पाठवणे ही कल्पनाच भितीदायक आहे. हा प्रश्न आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडला आहे", अशा कठोर शब्दांत द्रविडने या घटनेवर भावना व्यक्त केल्या.
'आशा आहे की आता लोक अधिक सावध होतील'
"आशा आहे की आता लोक अधिक सावध होतील, कारण ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला असे वाटते की तुम्ही लोकांच्या नजरेपासून दूर आहात. हे असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला सुरक्षित वाटते. जर ही सुरक्षा आणि गोपनीयता पाळली जात नसेल, तर ही बाब खरोखरच खूप वाईट आहे. कोहलीने ही घटना चांगल्या प्रकारे हाताळली याचा मला आनंद आहे. मला वाटते की त्याने हे खरोखर शांतपणे हाताळले. तो आता यातून पूर्णपणे बाहेर आला असून सरावा करण्यातही पूर्ण लक्ष देतो आहे," असेही राहुल द्रविडने स्पष्ट केले.