भारतीय संघाचा दी वॉल राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान होणे निश्चित झाले आहे. क्रिकेस सल्लागार समितीतील सदस्य सुलक्षण नाईक व आर पी सिंग यांनी बुधवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांच्या नावाची घोषणा केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतनंतर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेईल. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपणार आहे आणि त्यामुळे बीसीसीआयनं या पदासाठी अर्ज मागवले होते.
यावेळी बीसीसीआयनंरवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे आभार मानले. यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत दोन वेळा पराभूत केलं, इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत आघाडी घेतली. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ५-० असा दणदणीत विजयही याच टीमच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं मिळवला.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला,''टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर राहुल द्रविड याचे स्वागत करतो. एक खेळाडू म्हणून तो ग्रेट होताच आणि त्यानंतर त्यानं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटची सेवा केली. राहुलच्या या सेवेमुळे टीम इंडियाला अनेक युवा खेळाडू मिळाले.''
द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. राहुल द्रविड काय म्हणाला,'' टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवणे ही सर्वात मोठी सन्मानाची गोष्ट आहे. या नव्या जबाबदारीसाठी मी कटीबद्ध असेन. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आणि मी आशा करतो की तशीच कामगिरी माझ्या कार्यकाळात होईल. या संघातील अनेक खेळाडूंसोबत NCA, U 19 आणि India A संघात असताना काम केले आहे. पुढील दोन वर्षांत अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आहेत, यासाठी मी सज्ज आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येक दिवसागणित स्वत:मध्ये सुधारणा घडवण्याची सवय आहे आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे. ''