ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ( Rahul Dravid) विराजमान होणार असल्याचे बीसीसीआयनं बुधवारी जाहीर केले. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनतंर संपुष्टात येणार आहे आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीही (Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे आणि टीम इंडियाची कामगिरी बघता त्याच्याकडून वन डे संघाचेही नेतृत्व काढून घेतले जाईल, अशी शक्यता आहे. अशात रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचे नाव आघाडीवर आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड निश्चित करण्यापूर्वी पार पडलेल्या मुलाखतीत राहुल द्रविडलाही टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असावा? हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यानं सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह लगावला.
द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. राहुलचीही रोहित शर्मा यालाच मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून पसंती आहे. Indian Express नं दिलेल्या वृत्तानुसार राहुलला मुलाखतीत बीसीसीआयनं प्रश्न विचारला आणि त्यावर त्यानं रोहित शर्माचं नाव घेतलं. रोहित शर्माकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटचं विपुल अनुभव आहे आणि तो या प्रकारात स्टार आहे, त्यामुळे त्याची टीम इंडियाचा पुढील कर्णधार म्हणून निवड व्हायला हवी, असे द्रविडनं म्हटलं. तसंच रोहितच्या छत्रछायेखाली लोकेश राहुलला उप कर्णधारपद द्यावं, त्याच्याकडे कर्णधारपदाची क्षमता आहे, असेही द्रविड म्हणाला.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत मैदानावर उतरणार आहे. २०२२चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२३चा वन डे वर्ल्ड कप ही राहुल द्रविड समोरील मोठी आव्हानं आहेत. ''तीन फॉरमॅटमध्ये तीन कर्णधार निवडल्यानं बराच संभ्रम निर्माण होईल. पुढील आव्हानं लक्षात ठेऊन आतापासूनच निर्णय घ्यायला हवेत. वन डे व ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व रोहित शर्मानं करावं, अशी आमची इच्छा आहे. पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान होताच राहुल द्रविड काय म्हणाला?
राहुल द्रविड काय म्हणाला,'' टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवणे ही सर्वात मोठी सन्मानाची गोष्ट आहे. या नव्या जबाबदारीसाठी मी कटीबद्ध असेन. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आणि मी आशा करतो की तशीच कामगिरी माझ्या कार्यकाळात होईल. या संघातील अनेक खेळाडूंसोबत NCA, U 19 आणि India A संघात असताना काम केले आहे. पुढील दोन वर्षांत अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आहेत, यासाठी मी सज्ज आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येक दिवसागणित स्वत:मध्ये सुधारणा घडवण्याची सवय आहे आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे. ''