नवी दिल्ली : ‘द वाॅल’ अशी ख्याती लाभलेले भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांची टीम इंडियाचे मुख्य कोच म्हणून बुधवारी नियुक्ती झाली. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकानंतर सध्याचे कोच रवी शास्त्री यांचे ते स्थान घेतील. बीसीसीआयद्वारे नियुक्त सुलक्षणा नाईक आणि आर. पी. सिंग यांच्या क्रिकेटसल्लागार समितीने वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य कोच म्हणून द्रविड यांची एकमताने नियुक्ती केली. न्यूझीलंडविरुद्ध आगामीे स्थानिक मालिकेदरम्यान द्रविड हे पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
शास्त्री यांचा कार्यकाळ विश्वचषकासोबतच संपणार असल्याने बीसीसीआयने २६ ऑक्टोबरपर्यंत या पदासाठी अर्ज मागविले होते. बीसीसीआयने शास्त्री यांच्यासह गोलंदाजी कोच भरत अरुण, फलंदाजी कोच विक्रम राठोड आणि क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर या सर्वांचे उत्तम सेवा दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने बलाढ्य आणि निर्धास्त खेळ करीत स्थानिक आणि विदेशी मालिकांमध्ये वर्चस्व गाजविले. याच काळात भारताने कसोटीत अव्वल स्थानी झेप घेतली शिवाय इंग्लंडमध्ये झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलची अंतिम फेरी देखील गाठली होती.
‘भारतीय वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य कोच या नात्याने राहुल द्रविड यांचे स्वागत आहे. या खेळातील महान खेळाडू आणि महान कारकीर्द असलेले व्यक्तिमत्त्व संघाला लाभले. एनसीएचे प्रमुख म्हणून त्यांनी शेकडो युवा खेळाडू घडविले आहेत. त्यांची नवी कारकीर्द भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देईल,’ अशी अपेक्षा आहे.’- सौरव गांगुली, बीसीसीआय अध्यक्ष.