Rahul Dravid on Ishan Kishan Shreyas Iyer: धर्मशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंड विरुद्ध मोठा विजय नोंदवला आणि मालिका 4-1ने जिंकली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला सामना गमावल्यानंतर, पुढील चारही सामने जिंकले. विराट कोहली आणि मोहम्मद शमीसह अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यानंतर आता इशान किशन आणि श्रेयस अय्यरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने यावर स्पष्ट उत्तर दिले.
काय म्हणाला राहुल द्रविड?
धर्मशाला विजयानंतर पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरे देताना द्रविडने खुलासा केला की, श्रेयस आणि इशान दोघेही टीम इंडियात निवडीसाठी आमच्या योजनांमध्ये आहेत. द्रविड म्हणाला की देशांतर्गत क्रिकेट खेळणारा प्रत्येकजण निवडीसाठी पात्र आहे. एखाद्या खेळाडूचा बीसीसीआयशी करार आहे की नाही याचा विचार आम्ही करत नाही. बीसीसीआयने कोणत्या खेळाडूला करारबद्ध करावे हे मी ठरवत नाही. कराराचे निर्णय सिलेक्टर्स आणि बोर्ड घेते. यासाठी कोणते निकष आहेत हेही मला माहीत नाही. मला केवळ एखाद्या दौऱ्यासाठी सुरुवातीला १५ लोकांचे स्कॉड निवडायचे असते आणि त्यानंतर मी आणि रोहित अंतिम 'प्लेइंग 11' निवडतो.
बीसीसीआयच्या नव्या योजनेचे कौतुक
सर्फराज खानसह पाच क्रिकेटपटूंनी संपूर्ण मालिकेदरम्यान भारताकडून कसोटी पदार्पण केले आणि संघातील त्यांच्या निवडीचा निर्णय योग्य ठरविला. मालिका जिंकल्यानंतर, BCCI ने भारतात कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली. जिथे खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. दरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बीसीसीआयच्या नवीन योजनेचे कौतुक केले आहे. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटला चालना देण्याचा निर्णय स्तुत्य असल्याचे द्रविड म्हणाला.