T20 World Cup 2024 : भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अमेरिका व कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत पहिल्या सामन्यात उद्या आयर्लंडचा सामना करणार आहे. भारताने २०१३ मध्ये शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर जेतेपदाच्या अगदी जवळ जाऊनही त्यांना हा दुष्काळ संपवता आलेला नाही. २०२३ मध्ये घरच्या मैदानावर भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत फायनलपर्यंत पोहोचला, परंतु ऑस्ट्रेलियाने हा रथ अडवला. आता रोहित अँड टीम ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे आणि असे असताना संघातील प्रमुख सदस्याने ही आपली शेवटची स्पर्धा असल्याचे जाहीर केले.
भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याने ही त्याची टीम इंडियासोबत शेवटची स्पर्धा असल्याचे जाहीर केले. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी BCCI ने काही दिवसांपूर्वी अर्ज मागवले होते आणि सध्याच्या घडीला गौतम गंभीर याचे नाव आघाडीवर आहे. न्यू यॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्ध भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी द्रविड म्हणाला, “प्रशिक्षक म्हणून ही माझी शेवटची स्पर्धा आहे. हो, दुर्दैवाने, माझ्या आयुष्यातील या टप्प्यावर मी स्वतःला कोणत्या प्रकारचे वेळापत्रकायाचा विचार करता, मी पुन्हा अर्ज करू शकेन,असे वाटत नाही. त्यामुळे अर्थात ही माझी शेवटची स्पर्धा असेल.''
द्रविडने नोव्हेंबर २०२१ मध्ये रवी शास्त्री यांच्याकडून भारतीय संघाची सूत्रे हाती घेतली. गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेला वन डे वर्ल्ड कप हा भारताचा प्रशिक्षक या नात्याने त्याची शेवटची स्पर्धआ असल्याची अपेक्षा होती, परंतु त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेपर्यंत संघासोबत कायम राहण्याची तयारी दर्शवली. "मला हे काम करायला आवडते. भारताचा प्रशिक्षक म्हणून मला खूप आनंद झाला आणि मला वाटते की हे खरोखरच एक खास काम आहे. मला या संघात चांगल्या खेळाडूंचा मोठा समूह आहे," असेही तो पुढे म्हणाला.
द्रविडच्या कार्यकाळात भारताने १७ पैकी १४ ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या. यात इंग्लंड व न्यूझीलंड येथील मालिकांचाही समावेश आहे. १४ पैकी १० वन डे मालिका आणि ८ पैकी ६ कसोटी मालिका भारताने या काळात जिंकल्या. "खूप प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला हे विशेष वेगळे किंवा महत्त्वाचे असे काही वाटत नाही. मला नेहमीच वाटले की प्रत्येक सामना महत्त्वाचा आणि ते बदलणार नाही," असेही द्रविड म्हणाला.