मुंबई : विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण, एक गोष्ट अशी आहे की जी कोहलीला अन्य दिग्गज फलंदाजांपेक्षा वेगळी बनवते आणि भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडला याच गोष्टीनं प्रभावीत केले आहे. एखाद्या मालिकेत अपयश आल्यानंतर कोहली आपला खेळ सुधरवण्यासाठी आणखी मेहनत घेतो आणि तितकेच दमदार पुनरागमनही करतो; हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते, असे द्रविडने सांगितले.
द्रविड म्हणाला,''विराट कोहली सातत्याने स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करत आहे. त्याने साध्य केलेले विक्रम कोणालाही मोडणे शक्य नाही, असे आपल्याला वाटत आहे. सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटमध्ये 49-50 शतकं केली आहेत. लोकांना वाटतं त्यासाठी त्याने बराच वेळ घेतला. तेंडुलकरच्या या विक्रमाजवळ कोणी पोहोचेल, असे वाटले नव्हते आणि कोहली आता फक्त 10 शतकं दूर आहे.''
''त्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची झाली तर एखाद्या दौऱ्यात समाधानकारक कामगिरी न झाल्यास तो खचून जात नाही. तितक्याच ताकदीनं तो पुन्हा तयारीला लागतो आणि दमदार पुनरागमन करतो. 2014च्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला दौऱ्यात त्याला अपयश आले होते, परंतु तो मायदेशी परतला पुन्हा कसून सराव केला आणि त्यानंतर काय झाले हे सर्वांना माहित आहे. तो खेळात सातत्याने सुधारणा करत आहे,''
वर्ल्ड कप स्पर्धेत कोहली प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 जूनला होणार आहे.