Join us  

राहुल द्रविड यांचा मुख्य कोचपदासाठी अर्ज दाखल

Rahul Dravid : द्रविडच्या ताकदीची दुसरी व्यक्ती या शर्यतीत नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचीदेखील द्रविड प्रथम आणि एकमेव पसंती असल्याचे म्हटले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 8:08 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मुख्य कोच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या राहुल द्रविड यांनी मंगळवारी या पदासाठी औपचारिक अर्ज दाखल केला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सध्या अध्यक्ष असलेले द्रविड यांनी अर्ज दाखल करताच क्रिकेट सल्लागार समितीचे काम सोपे झाले. द्रविडच्या ताकदीची दुसरी व्यक्ती या शर्यतीत नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचीदेखील द्रविड प्रथम आणि एकमेव पसंती असल्याचे म्हटले जाते.

बीसीसीआयच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांनी औपचारिक अर्ज दाखल केला. आज अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख होती. एनसीएत त्यांच्या टीममध्ये असलेले गोलंदाजी कोच पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षण कोच अभय शर्मा यांनी आधीच अर्ज सादर केले आहेत.

द्रविडने दुबईत आयपीएल फायनलदरम्यान बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.  गांगुली आणि शाह यांनी द्रविड यांना टी-२० विश्वचषकानंतर कोचपद सांभाळण्याची ऑफर दिली. द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारतीय क्रिकेटचे नवे न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात रंगणाऱ्या मालिकेद्वारे सुरू होईल. त्यात ते नव्या टी-२० कर्णधारासोबत जबाबदारी स्वीकारतील.

लक्ष्मण एनसीए प्रमुख?भारताचे माजी महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद येण्याची दाट शक्यता आहे. लक्ष्मण यापुढे सनरायजर्स हैदराबाद संघाचे मेंटॉर राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. एनसीए प्रमुख बनताच लक्ष्मण यांना समालोचन आणि स्तंभलेखन थांबवावे लागेल.  द्रविड आणि लक्ष्मण हे दक्षिण विभागासाठी आणि भारतीय संघात सोबत खेळले. ते एकमेकांचे निकटवर्तीय आहेत. लक्ष्मण यांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली नसली तरी बीसीसीआय पुन्हा त्यांच्यासोबत संपर्क करणार आहे. लक्ष्मण यांनी नकार दिला तर अनिल कुंबळे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाऊ शकते; मात्र त्यासाठी बोर्ड कुंबळेंकडे संपर्क करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :राहूल द्रविड
Open in App