नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले राहुल द्रविड हे श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य कोच असतील. हा दौरा जुलैमध्ये होईल.
एनसीए प्रमुख बनल्यानंतर द्रविड यांनी भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघासोबत दौरा करणे बंद केले होते. मुख्य कोच रवी शास्त्री हे त्या काळात इंग्लंडमध्ये असतील. अशा वेळी दुय्यम दर्जाच्या संघाचे कोच म्हणून द्रविड संघासोबत राहणार आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, द्रविड हे संघासोबत कोच या नात्याने श्रीलंका दौरा करतील. गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे हेदेखील सहयोगी स्टाफचा भाग असतील.
भारताला श्रीलंकेत तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळायचे आहेत. या संघात अनेक युवा चेहऱ्यांचा भरणा असेल. हार्दिक पांड्या, शिखर धवन किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली जाईल. अय्यर त्याआधी खांद्याच्या दुखापतीतून बरा होईल का, याबद्दल उत्सुकता आहे.
राहुल द्रविडची कोच म्हणून कामगिरी२०१६च्या विश्वचषकात द्रविडच्या मार्गदर्शनात १९ वर्षांखालील संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. द्रविड यांच्या मार्गदर्शनात २०१८ ला भारताच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॅकअप म्हणून गेलेल्या खेळाडूंंनी मालिका जिंकून दिली. हे सर्वजण द्रविडच्या मार्गदर्शनात घडले होते.