Rahul Dravid, BJP : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सध्याही भारतीय संघाला मार्गदर्शन करत तो आपलं कर्तव्य पार पाडतोय. याच दरम्यान, राहुल द्रविडराजकारणात प्रवेश करणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. याला कारण म्हणजे, राहुल द्रविड या लवकरच एका राजकीय व्यासपीठावर दिसणार असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सभेला राहुल द्रविड हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. १२ ते १५ मे या कालावधीत हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती धर्मशालाचे भाजपा आमदार विशाल नेहरिया यांनी दिली.
तीन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्री जयराम ठाकूरही सहभागी होणार आहेत. अधिवेशनात देशभरातून तब्बल १३९ प्रतिनिधी आपली उपस्थिती नोंदवणार आहेत. "भाजप युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी १२ ते १५ मे दरम्यान धर्मशाला येथे होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि हिमाचल प्रदेशचे नेतृत्व यात सहभागी होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटन मंत्री आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडही यात सहभागी होणार आहे. त्याच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये एक संदेश जाईल की आपण केवळ राजकारणातच नाही, तर इतर क्षेत्रातही नावं मोठं करू शकतो," असेही नेहरिया यांनी स्पष्ट केले.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीआधी हा महत्त्वाचा कार्यक्रम ओयाजित केला जात आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात, भाजपने ४४ जागा जिंकल्या होत्या. ३५ हा बहुमताचा आकडा त्यांनी सहज गाठला होता. तर कॉंग्रेसला २१ जागांवर समाधान मानावे लागले होते.
Web Title: Rahul Dravid Indian Cricket Team Head Coach to attend BJP Yuva Morcha meeting in poll bound Himachal Pradesh Here is the reason why
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.