विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि त्याच्यासोबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री अन् त्यांची टीमही आहे. याच कालावधीत बीसीसीआयनं भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंची टीम श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवनकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक आहे. राहुल द्रविड याच्यावर सोपवलेली ही जबाबदारी शॉर्ट टर्मनसून आगामी काळात त्याच्याकडे रवी शास्त्री यांच्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे मत माजी खेळाडू रितिंदर सिंग सोढी यानं व्यक्त केले. द्रविड २०१४ मध्ये फलंदाज सहाय्यक म्हणून भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका १३ जुलैपासून सुरू होणार आहे. रवी शास्त्री इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि तेथे विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण, द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या टीमच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.
तो पुढे म्हणाला,''रवी शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. त्यांचा करार या वर्षाच्या शेवटी संपणार आहे. त्यामुळे पुढे राहुल द्रविडचे नाव समोर आले तर आश्चर्य वाटायला नको. त्याच्याकडे श्रीलंका दौऱ्यावरील संघाची जबाबदारी सोपवली आहे, याचा अर्थ असेच स्पष्ट संकेत आहेत.''