वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आणि तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचं भारतीयांचं स्वप्न भंगलं. कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडचंही पहिल्यांदाच वर्ल्ड कप विजेत्या संघांचा भाग होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा अखेरचा सामना होता. २०२१ मध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राहुल द्रविडचा बीसीसीआयसोबतचा करार संपला. तसंच हा करार आणखी वाढवत प्रशिक्षकपदावर कायम राहण्यास द्रविड फारसा इच्छुक नसल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर द्रविडकडून एका आयपीएल संघासोबत प्रशिक्षकपदासाठी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.
भारताचा स्टार फलंदाज राहिलेला राहुल द्रविड मागील दोन वर्षांपासून संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहात होता. द्रविडच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत भारताने अनेक विक्रमांना गवसणी घातली. यंदाचा वनडे वर्ल्ड कप जिंकणं संघाला शक्य झालं नसलं तरी संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जगाचं लक्ष वेधलं होतं. साखळी फेरीतील सर्वच्या सर्व ९ सामने जिंकलेल्या ब्ल्यू ब्रिगेडने सेमीफायनलमध्येही न्यूझीलंडला चितपट केलं होतं. मात्र अंतिम सामन्यात ६ विकेट्स राखून कांगारुंनी भारताला पराभूत केलं. तसंच या सामन्यातच प्रशिक्षक राहुल द्रविडचा बीसीसीआयसोबत केलेला दोन वर्षांचा करारही संपला. त्यामुळे द्रविड हा करार आणखी वाढवून घेणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र तो हा करार वाढवून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे समजते.
द्रविड प्रशिक्षक म्हणून कायम राहण्यास निरुत्साही का?
राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाने कसोटी आणि वन डेच्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानात हरवण्याची किमयाही साधली. तसंच यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत फायनल वगळता इतर सर्वच सामन्यांत भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवलं होतं. असं असताना राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून कायम राहण्यास फारसा उत्साही का नसावा, अशी चर्चा रंगत आहे. मात्र आधी जवळपास दोन दशकं खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत राहिलेला द्रविड मागील दोन वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून संघासोबत देश-विदेशात जात होता. परिणामी त्याला आपल्या कुटुंबाला फारसा वेळ देणं शक्य होत नव्हतं. याच कारणातून पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तो इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे.
कोणत्या आयपीएल संघाचा प्रशिक्षक होणार?
भारतात साधारण एप्रिल-मे महिन्यात आयपीएल सामन्यांचा थरार रंगतो. जवळपास दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेतील एखाद्या संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी राहुल द्रविड प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. मात्र हा संघ नेमका कोणता असेल, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे राहुल द्रविड नेमक्या कोणत्या आयपीएल संघाचा प्रशिक्षक होणार, हे कळण्यासाठी त्याच्या चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Web Title: Rahul Dravid new plan after the World Cup 2023 Will coach the IPL team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.