वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलनंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांचा करारही संपुष्टात आला. वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना भारतासाठी प्रशिक्षक म्हणून द्रविडचा शेवटचा सामना होता. द्रविड हा करार वाढवण्यात इच्छुक नसल्याचे वृत्त समोर येत आहे. यापुढे या पदावर राहायचे नाही, असे द्रविडने ठरवले आहे आणि बीसीसीआयलाही आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. ज्यानंतर आता त्याचा जवळचा मित्र व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दिसणार असल्याचे वृत्त आहे.
टाईम्स ऑफ इंडियानुसार लक्ष्मण हा टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असू शकतो आणि पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिका दौरा ही त्याची पहिली नियुक्ती असेल. लक्ष्मण हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि वर्ल्ड कपपूर्वी आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षकही होता. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान लक्ष्मणने अहमदाबादमध्ये बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली होती. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून तो दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १० डिसेंबरला पहिला ट्वेंटी-२० सामना होणार असून ४ डिसेंबरला संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होऊ शकतो.
द्रविडची नोव्हेंबर २०२१ मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी २ वर्षांच्या करारावर नियुक्ती करण्यात आली होती. द्रविडने बीसीसीआयशी संवाद साधला असून तो यापुढे प्रशिक्षकपदाचा करार वाढवण्यास इच्छुक नसल्याचे कळवले आहे. २० वर्ष त्याने भारतीय संघासोबत एक खेळाडू म्हणून प्रवास केला आणि मागील काही वर्षात त्याने पुन्हा तोच काळ अनुभवला. आता त्याला पुढे या पदावर कायम राहायचे नाही. त्याला पुन्हा NCA चा प्रमुख म्हणून राहायला आवडेल. जेणेकरून तो त्याच्या घरी बंगळुरूत राहू शकेल आणि युवा खेळाडूंना घडवू शकेल, अशी माहिती सुत्रांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार द्रविड आयपीएल फ्रँचायझीशी संपर्कात आहे आणि दोन वर्षांचा करार मिळू शकतो.
राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून कामगिरी
- भारतीय संघ वन डे व कसोटी क्रमवारीत नंबर १ बनला
- या वर्षाच्या सुरुवातीला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका विजय
- द्रविडच्या मार्गदर्शनाखाली घडलेला शुबमन गिलसारखा युवा स्टार भारताला मिळाला
- द्रविडच्या मदतीने विराट कोहली पुन्हा त्याच्या पूर्वीच्या फॉर्मात परतला
- दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर १-० असे आघाडीवर असूनही कसोटी मालिका गमावली
- २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हार, वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव
Web Title: Rahul Dravid not keen on contract extension; VVS Laxman set to be next India head coach, Dravid in talks with an IPL team for a big two year contract.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.