Rahul Dravid on Virat Kohli’s availability for the next match -भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीच्या उपलब्धतेबाबत मोठं विधान केलं आहे. वैयक्तिक कारणास्तव विराटने IND vs ENG मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून संघात निवड होऊनही माघार घेतली होती. तो तिसऱ्या कसोटीत परतेल अशी आशा व्यक्त केली जात आहे, परंतु त्याचा आणि BCCI चा अद्याप काहीच संपर्क होऊ शकला नसल्याचे वृत्त समोर येत आहे. भारताने आज दुसरी कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे आणि तिसऱ्या कसोटीसाठी अद्याप ८ दिवसांचा कालावधी आहे. पण, विराटच्या खेळण्यावर अद्याप सस्पेंस कायम आहे.
विराटने जानेवारी २०२४ मध्ये शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार विराट राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि विराटचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सने एक मोठे विधान केले आहे. विराट आणि अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या दुसऱ्या पाल्याला जन्म देणार असल्याचे त्याने म्हटले आहे. शिवाय सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती आणि त्यानुसार आईची प्रकृती खालावल्यामुळे विराटने माघार घेतल्याचा दावा केला गेला होता. मात्र यावर विराटच्या भावाने स्पष्टीकरण देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी येत्या काही दिवसांत संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. पण, विराटने त्याच्या समावेशाबाबत अद्याप बीसीसीआयला काहीच कळवलेले नाही. उर्वरित कसोटीसाठी संघ जाहीर करण्यापूर्वी निवड समिती व संघ व्यवस्थापन त्याच्याशी चर्चा करतील असे संकेत द्रविडने दिले. तो म्हणाला, विराट पुढील कसोटीत खेळेल की नाही, हा प्रश्न तुम्ही मला न विचारता निवड समितीला विचारायला हवा. पुढील तीन कसोटीसाठी ते संघ जाहीर करणार आहेत आणि याचे उत्तर देण्यासाठी ते योग्य व्यक्ती आहेत. त्यानंतर आम्हाला माहीत पडेल. मला खात्री आहे की लवकरच संघाची घोषणा केली जाईल. आम्ही त्यांच्याशी संपर्क करू आणि सांगू...दरम्यान, तिसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुलचे पुनरागमन होणार असल्याचे बोलले जात आहे. दुखापतीमुळे लोकेश व रवींद्र जडेजा यांनी दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. जडेजाला तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल, कदाचीत तो उर्वरित मालिकेतही खेळणार नाही, तेच लोकेश बरा झाला आहे.