Wriddhiman Saha Rahul Dravid : ‘वृद्धिमान साहा याने स्वत:च्या भविष्याबाबत आम्हा दोघांमध्ये झालेली चर्चा सार्वजनिक केली. त्यात काही आरोपही केले. मात्र मी अजिबात दुखावलेलो नाही. त्याने देशासाठी जे काही केले त्याबद्दल असलेल्या आदराच्या भावनेतूनच मी त्याला सल्ला दिला होता. स्वत:चे मत मांडण्याचा वृद्धिमान याला अधिकार आहे,’ या शब्दात भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांनी साहाच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत सोमवारी मौन सोडले.
श्रीलंकेविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी ३७ वर्षांचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाची भारतीय संघात निवड झाली नाही. यानंतर, माध्यमांसमोर साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत झालेले संभाषण सार्वजनिक केले. साहाने एका पत्रकाराने सोशल मीडियावर दिलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्याने वाद आणखी वाढला. वृद्धिमान साहाने रविवारी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याला निवृत्ती घेण्याचे संकेत दिले, असा आरोप साहाने केला होता.
‘न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीनंतर दादाने (सौरव गांगुली) मला मेसेज केला आणि माझ्या खेळीसाठी अभिनंदन केले. त्याने माझा आत्मविश्वास वाढविला. गांगुलीने माझे कौतुक करतानाच तो ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष असेपर्यंत संघातील स्थानाची चिंता करू नये, असे आश्वासन दिले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. पण त्यानंतर एका महिन्यातच चित्र पालटले,’ असे साहाने मुलाखतीत सांगितले होते.
राहुल द्रविडबद्दल बोलताना, ‘मला संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते की, आता माझ्या नावाचा विचार केला जाणार नाही. राहुल द्रविडनेही मी निवृत्तीचा विचार करावा,’ असा सल्ला दिला होता, असे साहाने म्हटले.
राहुल द्रविड यांचे प्रत्युत्तरसंपूर्ण प्रकरणावर वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका आटोपताच राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत उत्तर दिले. साहासोबतचे संभाषण समोर आल्यानंतर तुम्ही दु:खी आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना द्रविड म्हणाले, ‘मी अजिबात दु:खी नाही. साहाने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल मला खूप आदर आहे. मला त्याच्याबद्दल आदर होता म्हणून मी त्याच्याशी बोललो होतो. प्रामाणिकपणा आणि स्पष्ट भूमिका हा त्याचा हक्क आहे. मी नेहमीच खेळाडूंशी संवाद साधतो. मी जे काही बोलतो ते त्याला आवडेल आणि तो सहमत असेल असे नेहमीच होत नाही.’
बीसीसीआय करणार चौकशीसाहाने एका पत्रकाराशी केलेल्या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनीही याप्रकरणी वृद्धिमान साहाचे समर्थन केले. त्याचबरोबर आता बीसीसीआयनेही याप्रकरणी कारवाईची तयारी केली आहे. बीसीसीआयने कारवाई करण्यापूर्वी साहाला पत्रकाराचे नाव विचारले आहे.
गांगुलीच्या भावानेही दिली प्रतिक्रिया‘हे माझे वैयक्तिक मत आहे. पण त्याला (साहा) जे सांगितले गेले ते वैयक्तिक होते. त्याने हे सार्वजनिक करायला नको होते. तसेच तो रणजी ट्रॉफीही खेळू शकतो. त्याने बाहेर राहण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. जेव्हा त्याला संघात सामील व्हायचे असेल तेव्हा त्याच्यासाठी दरवाजे नेहमीच खुले असतील,’ असे सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहशिष गांगुली यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.