लखनऊ : भारतीय क्रिकेटसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने पहिला टी-20 विश्वचषक जिंकून आपले नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले. अंतिम फेरीत भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. अंतिम फेरीत गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत इंग्लंडला केवळ 68 धावांवर रोखले. यानंतर भारतीय फलंदाजांनी 6 षटके शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील संघाने विजेतेपद पटकावताच सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. पुरुष वरिष्ठ संघानेही 19 वर्षांखालील विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.
"भारतीय 19 वर्षांखालील महिला संघासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मैदानावर त्यांचा दिवस चांगला गेला", असे भारतीय पुरुष संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला. रविवारी लखनऊमध्ये झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या संघर्षपूर्ण विजयानंतर भारतीय संघाने यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविडने महिला संघाचे अभिनंदन केल्यानंतर पृथ्वी शॉकडे माईक सोपवला आणि म्हणाला की आता आम्ही माईक एका खेळाडूकडे देतो, ज्याने स्वतः असे केले आहे. दरम्यान, पृथ्वीने 2018 साली मुलांच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व केले होते.
पृथ्वी शॉ म्हणाला की, "माझ्या मते ही खूप मोठी कामगिरी आहे. महिलांच्या १९ वर्षांखालील संघाचे सर्वांना अभिनंदन करायचे आहे. खूप खूप अभिनंदन." यानंतर संपूर्ण पुरुष संघाकडून महिलांच्या १९ वर्षांखालील संघाचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, पृथ्वी शॉने माईक हातात धरला तेव्हा त्यांचे काय म्हणणे आहे, हे ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्याच्या मागे उभा राहून मुंबईकडून खेळणारा सूर्यकुमार यादवही ऐकण्यासाठी उत्सुक होता. यासोबतच 19 वर्षाखालील विश्वचषक 2018 मध्ये शॉच्या टीमचा महत्त्वाचा भाग असलेल्या शुभमन गिलच्याही चेहऱ्यावर हसू उमटले.
सर्वात निचांक खेळी
आयसीसी स्पर्धेच्या फायनलमधील सर्वबाद 68 ही सर्वात निचांक खेळी ठरली. यापूर्वी 2006 मध्ये 19 वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानने 71 धावांवर भारताचा डाव गुंडाळला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघालाही 20 धावांत दोन धक्के बसले. कर्णधार शेफाली वर्मा 15 धावांवर, तर श्वेता सेहरावत 5 धावांवर बाद झाल्या. सौम्या तिवारी (24) आणि गोंगडी त्रिशा (24) या जोडीने भारताचा डाव सावरला. भारताने 7 विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील मुलींनी तसाच पराक्रम केला.
Web Title: Rahul Dravid passes it on to Prithvi Shaw to congratulate India U-19 Women’s World Cup winning team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.