कराची : भारतीय संघाचा दी वॉल राहुल द्रविड हा युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने 19 वर्षांखाली वर्ल्ड कप जिंकला, तर भारत A संघही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. द्रविडच्या या योगदानाची दखल घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही (पीसीबी) माजी खेळाडूंची विविध वयोगटातील राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी व व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार माजी कर्णधार युनिस खान याची पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे.
युनिसने गतवर्षी निवृत्ती घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक धावांचा विक्रम युनिसच्या नावावर आहे आणि दहा हजार धावा करणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे. त्याने कनिष्ठ संघाला प्रशिक्षण देणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
''ऑस्ट्रेलियाही युवा खेळाडू घडवण्यासाठी रॉड्नी मार्श, अॅलेन बॉर्डर आणि रिकी पाँटिंग या माजी खेळाडूंची मदत करत आहेत. राहुल द्रविडने भारताच्या 19 वर्षांखालील संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे आणि या संघाने उल्लेखनीय कामगिरीही केली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील युवा पिढी घडवण्यासाठी माजी खेळाडूंची मदत घेतली जाईल, '' असे पीसीबीचे अध्यक्ष एहसान मानी यांनी सांगितले.
द्रविड सध्या भारताच्या 19 वर्षांखालील आणि भारत A संघाला मार्गदर्शन करत आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा खेळाडूंनी वर्ल्ड कप उंचावला. ऑस्ट्रेलियात बॉर्डर हे राष्ट्रीय निवड समितीत आहेत, तर पाँटिंगचा नुकताच राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकांच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे पीसीबी सातत्याने 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक बदलत आली आहे. त्यामुळे खेळाडूंची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे त्यांनी माजी खेळाडूंकडून सहकार्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मानी यांनी सांगितले की,'' भविष्यातील खेळाडू घडवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी माजी खेळाडूंना पाचारण करण्यात येणार आहे. भारताने त्याची सुरुवात केली आहे आणि त्यातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले."
Web Title: 'Rahul Dravid' pattern to be implemented by Pakistan board; Former cricketer to form next generation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.