Rahul Dravid, Ind vs Sa: दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ तर पावसामुळे अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. पण भारतीय संघाच्या दमदार सुरुवातीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. पण ड्रेसिंग रुममधील वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं खराब फॉर्माशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं आहे.
सामन्याच्या चहापानाच्या वेळेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात राहुल द्रविडनं चेतेश्वर पुजाराच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रोत्साहन दिल्याचं दिसून येत आहे. यात चेतेश्वर पुजारा देखील स्मितहास्त करत द्रविडनं दिलेला पाठिंबा स्विकारताना दिसून येतो. संघाचा प्रशिक्षक म्हणून संघातील खराब फॉर्म करत असलेल्या खेळाडूच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहण्याचं राहुल द्रविडच्या याच पुढाकाराचं कौतुक नेटिझन्सकडून केलं जात आहे.
राहुल द्रविडच्या प्रतिक्रियेचं सर्वजण कौतुक करत आहेत. क्रिकेटमध्ये असे दिवस येत असतात की ज्यावेळी तुम्हाला खूप कठीण काळातून जावं लागतं अशावेळी संघाचा प्रशिक्षकच एक महत्त्वाचा दुवा ठरतो. संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नव्हे, तर फॉर्मशी झगडत असलेल्या खेळाडूकडे लक्ष केंद्रीत करण्याचं काम प्रशिक्षकाचं असतं हे द्रविडनं पुन्हा एकदा दाखवून दिल्याचंही क्रिकेट चाहते म्हणत आहेत.