नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवल्याची घोषणा केली. म्हणजेच पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकापर्यंत राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहतील. मात्र, आता द्रविड यांच्या एका विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मी अद्याप करारावर स्वाक्षरी केली नसल्याचा दावा द्रविड यांनी केला आहे. खरं तर ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ पर्यंतच तुमचा कार्यकाळ आहे का असे विचारले असताना त्यांनी म्हटले, "मी अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही."
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला. मात्र भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि कर्णधार रोहित शर्मासोबतचा उत्कृष्ट समन्वय यामुळे द्रविड यांचा कार्यकाळ वाढणे अपेक्षित होते. बीसीसीआयनेही यावर शिक्कामोर्तब करत ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला. राहुल द्रविड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, "मी अद्याप बीसीसीआयसोबत करार केलेला नाही, करारावर स्वाक्षरी केलेली नाही. मात्र कार्यकाळ वाढविण्याबाबत चर्चा झाली आहे. कागदपत्रे मिळाल्यावर मी बघेन.
प्रशिक्षकपदी कायम राहिल्यानंतर राहुल द्रविड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे संस्मरणीय राहिली आहेत. आम्ही या संपूर्ण प्रवासात एकत्र येऊन चढ उतार पाहिले. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये स्थापित केलेल्या संस्कृतीचा मला खरोखर अभिमान आहे. आमच्या संघाकडे असलेली कौशल्ये आणि प्रतिभा अभूतपूर्व आहे. मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या दृष्टीला समर्थन दिल्याबद्दल आणि या काळात पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद देतो. ही भूमिका स्वीकारल्यानंतर मला घरापासून बराच काळ दूर रहावे लागले आणि मी माझ्या कुटुंबाच्या त्याग आणि समर्थनाची मनापासून प्रशंसा करतो. त्यांची पडद्यामागची भूमिका मोलाची आहे", असे त्यांनी बुधवारी सांगितले.
लवकरच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार वन डे विश्वचषकाची स्पर्धा पार पडल्यानंतर क्रिकेट विश्व ट्वेंटी-२० क्रिकेटकडे वळत चालले आहे. कारण आगामी काळात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक होणार आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त सहा महिने उरले आहेत. दरम्यान, आयपीएल सारखी मोठी स्पर्धा होणार आहे, ज्यामुळे तयारी मजबूत होण्यास खूप मदत होईल.