IND vs AFG : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाबाहेर ठेवल्याच्या वृत्तावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठं विधान केलं आहे. द्रविडने या वृत्तांचे खंडन केले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ पूर्वी भारताची ही शेवटची ट्वेंटी-२० मालिका आहे आणि त्यात इशान व अय्यर यांना वगळण्यामागे हे वृत्त सांगितले जात होते, ते चुकीचे असल्याचे द्रविडने स्पष्ट केले.
किशनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विश्रांतीची विनंती केली आणि त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून मुक्त करण्यात आले. द्रविडने सांगितले की किशनने अद्याप निवडीसाठी उपलब्ध असल्याचे बीसीसीआयला कळवलेले नाही. " इथे शिस्तभंगाचा विषयच येत नाही. इशान किशन निवडीसाठी उपलब्ध नव्हता. इशानने विश्रांतीची विनंती केली, जी आम्ही दक्षिण आफ्रिकेत मान्य केली. आम्ही त्याला पाठिंबा दिला. त्याने अद्याप निवडीसाठी उपलब्ध असल्याचे कळवलेले नाही. जेव्हा तो उपलब्ध असेल, तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळेल आणि निवडीसाठी स्वत:ला उपलब्ध करून देईल," असे द्रविडने आज पत्रकार परिषदेत सांगितले.
अय्यर बद्दल द्रविडने सांगितले की, “नक्कीच, श्रेयस अय्यरच्या बाबतीत, त्याचा समावेश न करण्यामागे कोणतेही शिस्तभंगाचे कारण नाही. संघात अनेक फलंदाज होते. तो दक्षिण आफ्रिकेत ट्वेंटी-२० मालिका खेळला नाही. प्रत्येकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणे सोपे नाही.” दरम्यान, अय्यर वानखेडे स्टेडियमवर १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंध्र प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात मुंबईकडून खेळणार आहे.