Join us  

"तो पराभव हृदयद्रावक होता पण...", वर्ल्ड कपची ट्रॉफी हातून गेल्यानंतर द्रविडची पहिलीच प्रतिक्रिया

वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 1:03 PM

Open in App

आयसीसी वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह तमाम भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आणि टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषकाच्या किताबापासून दूर राहिली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्याची किमया साधली. वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील निराशाजनक पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे मंगळवारपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झालेल्या संघाचा भाग होते. त्यांनी यानंतर काही मर्यादित षटकांचे सामने खेळले परंतु इतर खेळाडू पाच आठवड्यांनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसले.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळतो आहे. ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले, तर वन डे मालिकेसाठी भारताची धुरा लोकेश राहुलच्या खांद्यावर होती. आता कसोटी मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात असणार आहे. 

तो हृदयद्रावक पराभव होता - द्रविड विश्वचषकातील पराभवाबद्दल बोलताना द्रविड यांनी सांगितले की, तो हृदयद्रावक पराभव होता पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगाने पुढे जावे लागते आणि आमच्यासमोर आणखी एक महत्त्वाची मालिका आहे. या सर्व मालिका दुसऱ्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या संदर्भात आहेत (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल) त्यामुळे ते खूप महत्वाचे आहे. खरं तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर प्रथमच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मैदानात दिसतील. भारतीय संघाने आफ्रिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत संपवली, तर वन डे मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली. आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून, सलामीचा सामना उद्यापासून सेंच्युरियन येथे खेळवला जाईल. तर, ३ जानेवारीपासून केपटाउन येथे दुसऱ्या सामन्याचा थरार रंगणार आहे. 

कसोटी मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा. 

मालिकेचे वेळापत्रक 

  1. २६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून (सेंच्युरियन)
  2. ३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून  (केपटाउन)
टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराहुल द्रविड