Rahul Dravid, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या (South Africa Test Series) पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात विराट कोहलीला भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्याचा निर्णयाबाबत विचारण्यात आलं असता राहुल द्रविडनं पहिल्यांदाच स्पष्टपणे भूमिका जाहीर केली आहे. "कर्णधार निवडणं हे माझं काम नाही. ते निवड समितीचं काम आहे", असं राहुल द्रविडनं म्हटलं आहे.
विराट कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. पण कोहलीला आता एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुनही डच्चू दिला आहे. रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन काढण्यात आल्याच्या मुद्द्यावर राहुल द्रविडला विचारण्यात आलं असता त्यानं यावर जास्त लक्ष देण्याची सध्या गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.
"कर्णधार निवडणं हे माझं काम नाही, ते निवड समितीचं काम आहे आणि याविषयावर चर्चा करण्यासारखी स्थिती नाही. आमचं संपूर्ण लक्ष हे कसोटी मालिकेवरच आहे. मालिका जिंकण्यासाठी तुम्ही कुठल्या एका खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढे जात आहोत", असं राहुल द्रविड म्हणाला.
भारत विरुद्ध द.आफ्रिका यांच्या उद्यापासून सेंच्युरियनवर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षीच्या बॉक्सिंग डे पासून १५ कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेट संघ सध्या आपल्या आठव्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये आठवी कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघ १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेच्या सात दौऱ्यांमध्ये एकूण २० कसोटी सामने खेळले आहेत. यामधील केवळ तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे. तर १० सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल आहे. उर्वरित सात सामने अनिर्णित राहिले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या आतापर्यंतच्या सात दौऱ्यांमध्ये सहा कर्णधारांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी एकाही कर्णधाराला आफ्रिकेच्या भूमीत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र तीन कर्णधारांना प्रत्येकी एक कसोटी जिंकण्यात यश मिळाले आहे.