भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. जगभरात 'द वॉल' अशी ख्याती असलेल्या राहुल द्रविडच्या साधेपणाचं अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील, वाचले असतील. आता त्यात आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे. बंगळुरूतील एका पुस्तक कार्यक्रमाचा फोटो समोर आला आहे. त्यात राहुल द्रविड शेवटच्या खुर्चीवर अतिशय शांतपणे बसलेला दिसत आहे.
सोशल मीडियावर राहुल द्रविडच्या साधेपणाची चर्चा आहे. इतक्या प्रसिद्धीनंतरही माणूस इतका साधा कसा काय राहू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला राहुलचा फोटो बंगळुरूच्या एका पुस्तकाच्या दुकानातील आहे. तिथे माजी क्रिकेटपटू जी. विश्वनाथ त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी आले होते. तिथे राहुल द्रविडदेखील उपस्थित होता. कार्यक्रमात राहुल सर्वात शेवटी मास्क लावून शांत बसला होता.
एका ट्विटर यूजरनं कार्यक्रमातील घटनाक्रम सांगितला आहे. 'राहुल कार्यक्रमाला आला. त्यानं रामचंद्र गुहा यांच्याशी संवाद साधला. माझ्यासोबत समीर होता. त्यानं तो राहुल द्रविडच असल्याचं ओळखलं. त्यानंतर राहुल मागच्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याच्या शेजारीच एक मुलगी बसली होती. ती कोणाच्या बाजूला बसली आहे, याची तिला कल्पनादेखील नव्हती,' असा अनुभव Kashy नावाच्या व्यक्तीनं ट्विट केला आहे.
कार्यक्रमात विश्वनाथ यांचं आगमन झालं. त्यांनी राहुलला पाहिलं. त्यांच्याशी बोलण्यासाठी राहुल पुढे आला. सगळ्यांना त्यानं हॅलो म्हटलं. त्यानंतर तो पुन्हा मागे बसण्यासाठी निघून गेला. कार्यक्रम विश्वनाथ यांच्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष त्यांच्यावरच असायला हवं, असं द्रविडला वाटतं होतं, असं ट्विटर यूजरनं म्हटलं आहे. त्यानं राहुल द्रविडसोबतचा सेल्फीदेखील ट्विट केला आहे.