मुंबई : कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमातील वादग्रस्त विधानांमुळे निलंबित करण्यात आलेल्या क्रिकेटपटू लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या जागी भारतीय संघात विजय शंकर आणि शुबमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली आहे. त्यापुढील न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलची वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. शुबमनची वर्णी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडशी सल्ला घेतल्यानंतर झाली आहे, अशी माहिती निवड समिती प्रमुख एम एस के प्रसाद यांनी दिली.
भारताला 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जेतेपद जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचललेल्या शुबमनसाठी ही सुवर्णसंधी आहे. पंजाबच्या शुबमनचा विचार नक्की कोणत्या पोझिशनसाठी केला गेला आहे, याचे उत्तरही प्रसाद यांनी दिले. ते म्हणाले," शुबमन सलामील किंवा मधली फळी या दोन्ही पोझिशनवर सहजतेनेखेळणारा फलंदाज आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर राखीव सलामीवीर म्हणून आम्ही त्याची निवड केली आहे. तो वर्ल्ड कप संघात असेल की नाही याबाबत मी आता कोणतीच प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, त्याने भारत A संघासोबतचा न्यूझीलंड दौरा सलामीवीर म्हणून गाजवला आहे."
गतवर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड्स कप स्पर्धेत शुबमनने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या युवासेनेनं जेतेपद पटकावले होते. त्यामुळे त्याची निवड करताना द्रविडचा सल्ला घेतल्याचे प्रसाद म्हणाले. "शुबमन आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार आहे का, याब आम्ही द्रविडशी चर्चा केली. भारत A संघासोबत त्याने न्यूझीलंड दौरा गाजवून वरिष्ठ संघाचे दार ठोठावले होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9 सामन्यात 1089 धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 36 सामन्यात 1529 धावा केल्या आहेत. रणजी करंडक स्पर्धेत त्याने 9 डावात 104 च्या सरासरीने 728 धावा केल्या आहेत. त्यात तमिळनाडूविरुद्ध केलेल्या 268 धावांच्या खेळीचा विशेष उल्लेख करावा लागेल.