विराट कोहली-रवी शास्त्री या पर्वातून आता टीम इंडिया राहुल द्रविड व रोहित शर्मा या नव्या पर्वात पाऊल टाकत आहे. रोहित-राहुल यांच्यासमोर पहिले आव्हान असणार आहे ते न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेचे... १७ नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होत आहे. पण, या मालिकेपूर्वी राहुल द्रविडनं ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर खेळाडूंच्या हितासाठी महत्त्वाचा मुद्दा क्रिकेट सल्लागार समितीसमोर ( CAC) ठेवला आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही बायो बबल थकव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मागील सहा महिन्यांपासून खेळाडू बायो बबलमध्ये आहेत आणि त्यामुळे ते केवळ मानसिकदृष्ट्याच नव्हे, तर शारीरिकदृष्ट्याही थकले असल्याचे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्ध निवडलेल्या ट्वेंटी-२० संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल व आवेश खान या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
नवनिर्वाचीत प्रशिक्षक राहुल द्रविड यानीही खेळाडूंच्या थकव्याचा मुद्दा क्रिकेट सल्लागार समितीकडे मांडला आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासोबत खेळाडूंचा वर्कलोड कसा कमी करता येईल, यावर काम करणार आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार द्रविडनं सततच्या क्रिकेटमुळे खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक थकव्याचा मुद्दा CACकडे मांडला आहे. महिन्याभरापूर्वीच त्यानं ही गोष्ट निदर्शनास आणू नदिली होती. आता मुख्य प्रशिक्षक म्हणून तो रोटेशन ( आलटूनपालटून) पद्धतीनं खेळाडूंना संधी देऊन त्यांच्यावरील वर्कलोड कसा कमी करता येईल, यासाठी जय शाह यांच्याशी सल्लामसलत करणार आहे.
रोटेशन, विश्रांती आणि वर्कलोड व्यवस्थापन हे पूर्णपणे निवड समितीवर अवलंबून आहे. पण, अनेक खेळाडूंनी बायो बबल थकव्याचा मुद्दा मांडल्यानंतर राहुल द्रविड अॅक्शन मोडमध्ये आला आहे. निवड समितीनं संघ जाहीर केल्यानंतर खेळाडूंवरील भार कमी कसा करता येईल, यासाठी द्रविडनं काम सुरू केलं आहे. त्यामुळे यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झालेली नाचक्की पुढच्यावेळेस टाळता नक्की येईल.
संबंधित बातम्या
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिक पांड्याची गच्छंती, नवीन चेहऱ्यांना संधी