१४० कोटी भारतीयांच्या स्वप्नाचा ऑस्ट्रेलियाने काल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमर चुराडा केला. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने अडवला... या वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताने कांगारूंना पराभूत केले होते आणि त्यांनी त्याचा वचपा थेट फायनलमध्ये काढला. कोट्यवधी भारतीय काल ढसाढसा रडले... रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १२ वर्षांचा वर्ल्ड कप दुष्काळ संपवेल असे स्वप्न काल भंगले. ग्लेन मॅक्सवेलने विजयी धाव घेतल्यानंतर रोहितसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नेहमीसारखा उत्साह नव्हता. गेला दीड महिना ज्या खेळाडूंना आनंदाने हसताना-खेळताना पाहिले होते, त्यांना असे इमोशनल पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांनाही काही सुचले नाही.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडला ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दल विचारले असता तो म्हणाला, हे निराशाजनक आहे, ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक खेळाडू भावनिक झाला होता. एक प्रशिक्षक म्हणून मला त्यांच्या सामोरे जाण्याची हिंमत होत नव्हती. कारण, मला माहित्येय या पोरांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे ती. त्यामुळे एक कोच म्हणून त्यांना असे पाहावत नव्हते, या सर्व पोरांना मी वैयक्तिक ओळखतो.
''मागील काही महिन्यांत या पोरांनी प्रचंड मेहनत घेतली, परंतु हा खेळ आहे आणि असं घडत असतं. आणि त्या दिवसाचा सर्वोत्तम संघ जिंकतो. या पराभवातून आम्ही शिकलो आहोत आणि इतर सर्वांप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. एक खेळाडू म्हणून तुमच्याकडून हिच अपेक्षा आहे. खेळात चढ-उतार येत राहतात, परंतु तुम्हाला थांबून चालत नाही. कारण, जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत, तर पुनरागमन कसं करता येईल,''असेही द्रविड म्हणाला.