राजकोट : राहुल द्रविड हे जूनमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम असतील, या वृत्तास बीसीसीआय सचिव जय शाह यांनी गुरुवारी दुजोरा दिला आहे.
द्रविड यांचा कार्यकाळ मागच्या वर्षी वनडे विश्वचषक आटोपताच संपला होता. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ ठरविण्याऐवजी सहयोगी स्टाफसह डिसेंबर-जानेवारीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कायम राहण्यास सांगण्यात आले होते. शाह यांनी द्रविड यांच्यासोबत सल्लामसलत केल्यानंतर त्यांना जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. एका कार्यक्रमानंतर शाह म्हणाले, ‘विश्वचषकानंतर द्रविड यांना दक्षिण आफ्रिका दौरा करावा लागला. दरम्यान, आमची भेट झाली नव्हती. ती आज झाली. द्रविडसारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या कराराबाबत काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ते टी-२० विश्वचषकापर्यंत पदावर कायम असतील. टी-२० विश्वचषकाआधी द्रविड यांच्याशी वारंवार चर्चा होत राहील. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी स्वत: त्यांच्याशी भेटणार आहे. सध्या पाठोपाठ मालिकांचे आयोजन होत आहे.’