नवी दिल्ली - भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं आपल्या शिष्यांना चांगलंच खडसावलं आहे. आयपीएल लिलावाऐवजी विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला आहे. आयपीएलची भारतीय क्रिकेटपटूंमध्ये असणारी क्रेझ ही सर्वश्रुत आहे. सध्या भारताचा अंडर-19चा संघ न्यूझीलंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळतो आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव 27 आणि 28 जानेवारी रोजी बंगळुरुत रंगणार आहे. भारताच्या 19 वर्षांखालील संघातील काही खेळाडूंना यंदाच्या लिलावात चांगल्या रकमेची बोली मिळण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या खेळाडूंना आयपीएल लिलावाऐवजी विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे.
ESPNCricinfo या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राहुल द्रविड बोलत होता. यावेळी तो म्हणाला, आयपीएलचा लिलाव प्रत्येक वर्षी होणार आहे. विश्वचषकाची संधी ४ वर्षांत पुन्हा येणार नाही”, असं म्हणत मी खेळाडूंना विश्वचषकातील सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. द्रविड पुढे म्हणाला, "आम्ही या खेळाडूंचा फोकस कशावर हवा आणि त्यांचे जवळच्या ध्येयाच्या तुलनेत लांब पल्ल्याचे ध्येय काय असावे यावर चर्चा करतो" द्रविडने विश्वचषकाचे महत्व समजावून देताना सांगितले की आयपीएल लिलाव हा दरवर्षी येणार आहे, पण विश्वचषकात खेळण्याची संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. याबद्दल पुढे द्रविड म्हणाला, "लिलाव अशी एक गोष्ट नाही की ज्यावर खेळाडू नियंत्रण ठेवू शकतात. एक किंवा दोन लिलाव खेळाडूंच्या दीर्घ कारकिर्दीवर जास्त परिणाम करू शकत नाही."
"लिलाव प्रत्येक वर्षी असणार आहे. पण त्यांना प्रत्येकवर्षी शक्य झाल तर विश्वचषक उपांत्य फेरीत भारताकडून खेळण्याची संधी मिळेलच असे नाही. असे नेहमी होत नाही." 19 वर्षांखालील भारतीय संघाने 2016 च्या विश्वचषकात द्रविडांच्याच प्रशिक्षणाखाली अंतिम सामन्यात धडक मारली होती.
उपांत्य फेरीत पाकिस्तानशी होणार लढत -
अंडर-19 विश्वचषकात बांगलादेशचा तब्बल 131 धावांनी पराभव करत भारतीय क्रिकेट संघाने थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महत्वाचं म्हणजे उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच कालावधीपासून सामना रंगलेला नाही. त्यामुळे या दोन्ही संघांमधील काँटे की टक्कर क्रिकेट रसिकांना मंगळवारी पहायला मिळणार आहे.
पृथ्वी शॉच्या नेतृत्वात खेळणा-या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर 266 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांगलादेशचा डाव 134 धावातच आटोपला. या विजयासोबत भारतीय संघाने विश्वचषकातला सलग चौथा विजय साजरा केला. भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेवर 10-10 विकेट्स राखून विजय मिळवला होता.