Rahul Dravid, T20 World Cup 2024: राहुल द्रविड हे अतिशय संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असताना देखील त्याने त्याची कामगिरी चोख बजावली. द्रविड हा अतिशय शांत असला तरीही आपले मत समोरच्याला प्रभावीपणे पटवून देण्याची कला त्याला अवगत आहे. याच कलेचा वापर टी२० विश्वचषक फायनलच्या आदल्या दिवशी त्याने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये केल्याचे आता समोर आले आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने राहुल द्रविडने केलेल्या टू स्लाईड प्रेझेंटेशन बाबत माहिती दिली.
सूर्यकुमार यादवने आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, द्रविडने ड्रेसिंग रुममध्ये एक प्रेझेंटेशन दाखवले. त्यात भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंनी खेळलेल्या एकूण टी२० सामन्यांची संख्या दाखवली होती. यात कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली पासून ते युवा यशस्वी जैस्वालच्या टी२० सामन्यांच्या संख्येचाही समावेश होता. ती संख्या ८००हून जास्त होती. त्यानंतरच्या स्लाइडमध्ये टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफपैकी राहुल द्रविड, फलंदाजी कोच विक्रम राठोड, गोलंदाजी कोच पारस म्हांबरे आणि फिल्डिंग कोच दिलीप यांनी खेळलेल्या टी२० सामन्यांची संख्या होती. त्यांच्यापैकी आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळलेला केवळ राहुल द्रविडच होता. त्यानेही केवळ एकच सामना खेळला होता."
"द्रविडने पुढे सांगितले की IPL आणि सैयद मुश्ताक अली स्पर्धांना धन्यवाद. कारण त्यामुळे भारतीय खेळाडूंनी बरेच टी२० सामने खेळले आहेत. आता अशा परिस्थितीत तुम्हाला टी२० चा सर्वाधिक अनुभव आहे. हे सामने कसे खेळले जातात याचा तुम्हाला सर्वोत्तम अनुभव आहे. त्यामुळे अशा सामन्यांमध्ये कसे खेळायचे ते मी आता तुमच्यावर सोडतो. तुमचे सगळे हेवेदावे इथेच सोडून द्या, बाकीच्या गोष्टी आमच्यावर सोडा आणि तुम्ही फक्त मैदानात जाऊन खेळाचा आनंद घ्या," असेही सूर्यकुमार म्हणाला.
"स्पर्धेत आपल्याला कुठे जायचंय याबद्दल कोणीही चर्चा करत बसणार नाही. आपण जो सामना खेळत आहोत त्यापुरतेच बोलूया असे आम्ही सर्वांनी आधीच ठरवले होते. त्यामुळे सुपर-८ हा आमच्यासाठी पुढचा टप्पा होता, तसेच फायनल हा देखील आमच्यासाठी सर्प्राईजचा टप्पाच होता," असेही सूर्या म्हणाला.