ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील गयाना येथे इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) पुन्हा अपयशी ठरला. या वर्ल्ड कपमध्ये विराट पाचव्यांदा एक अंकी धावसंख्येवर बाद झाला. कोहलीने इंग्लंडविरुद्ध ९ धावा केल्या आणि त्याला स्पर्धेतील सात डावांमध्ये ७५ धावाच करता आल्या आहेत. बाद झाल्यानंतर कोहली निराश बसला होता आणि त्यावेळी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा त्याच्याजवळ गेला अन् त्याने कोहलीचे सांत्वन केले.
कोहली व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत बसलेला दिसत आहे. अक्षर पटेल ( Axar Patel) आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडला गुडघे टेकायला लावले. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांच्यासह फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १७१ धावा उभ्या केल्या. फिरकीला साथ देणाऱ्या संथ खेळपट्टीवर पटेलने ( ३-२३) इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. त्यानंतर कुलदीप यादवने ( ३-१९) कमाल करताना भारताचा विजय पक्का केला. इंग्लंडचा डाव १०३ धावांवर गुंडाळला आणि २०२२च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने केलेल्या पराभवाचा भारताने वचपा काढला. टीम इंडिया जेतेपदाच्या लढतीत २९ जूनला दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे.