नवी दिल्ली : माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट प्रमुख पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जागा घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागेल. भारतीय क्रिकेट बोर्डाने द्रविड यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदासाठी अर्ज मागवले होते.
बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार करारामध्ये वाढ करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे निवड प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाते. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, राहुल यांनी क्रिकेट प्रमुख पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. आता वास्तवात सेंटर ऑफ एक्सिलेन्स बनलेल्या एनसीएचा चेहरा बदलण्यासाठी राहुल यांनी शानदार काम केले आहे. त्यामुळे ते पदावर कायम राहू शकतात. राहुल यांच्याशिवाय इतर कुणीही या पदासाठी अर्ज केलेला नाही. ’
बीसीसीआयने अर्ज करण्यासाठी काही दिवसांची मुदत वाढवली आहे. मात्र राहुल हे या स्पर्धेत आहेत. त्यामुळे इतरांना माहित आहे. की या पदासाठी अर्ज करण्यात काहीही अर्थ नाही. ही फक्त औपचारिकताच असेल. त्यांच्या अर्जाने हे सिद्ध होते की ते युवा खेळाडूंसोबत काम करून राष्ट्रीय क्रिकेट संघाला मदत करु इच्छित आहे. याच दरम्यान वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी हे देखील दुखापतींमुळे एनसीएत पोहचले आहेत. शुभमन गील आधीच येथे आहे.