Rahul Dravid Shubman Gill, WTC Final 2023 IND vs AUS: शुभमन गिल हा एक दमदार फलंदाज आहे. तो टीम इंडियाचा उगवता तारा आहे, असे सारेच म्हणताना दिसतात. शुभमन गिलला इंग्लंडमध्ये एकच कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. तो ओव्हलच्या मैदानावर पहिल्यांदाच खेळणार आहे. मात्र तसे असले तरीही त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो संघातील महत्त्वाचा खेळाडू मानला जातोय. त्यातच आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही शुबमनवर स्तुतिसुमने उधळली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शुबमन गिलबद्दल मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं.
काय म्हणाला राहुल द्रविड?
मैदानावर शुबमन गिलच्या फलंदाजीची चर्चा आहे. 2023 मध्ये त्याने ज्याप्रकारे दमदार फॉर्म दाखवलाय, त्यानुसार तो चांगला खेळ करू शकेल. टी२० मधून कसोटी म्हणजे फक्त चेंडूंचा रंग बदलला आहे. शुभमन गिलच्या फलंदाजीची शैली आणि मूड बदललेला नाही. त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत. त्याने एवढ्या धावा केल्या आहेत की कदाचित त्याच्या आसपास कोणीही नसेल. शुभमन गिल हा स्टार आहे. त्याचा क्लास आहे. मी गिलला त्याच्या अंडर-19 दिवसांपासून पाहत आहे, तो खूप खास आहे. त्याला टीम इंडियात येऊन काही वर्षे झाली आहेत, पण त्याने आपले स्थान पक्के केले आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली क्षमता सिद्ध करत आहे हे पाहून आनंद होत आहे, असे राहुल द्रविड म्हणाला.
2023 मध्ये गिलची कामगिरी
2023 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, शुभमन गिलने 61.25 च्या सरासरीने 980 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5 शतकांचा समावेश आहे. यामध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 154 धावा केल्या आहेत, ज्या त्याने 2 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतकासह केल्या आहेत. मोठी गोष्ट म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच आहे. गिलच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 15 कसोटींमध्ये 2 शतकांसह 890 धावा केल्या आहेत.