- अयाझ मेमन
भारताच्या युवा क्रिकेट संघाने आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत दणदणीत बाजी मारली. संपूर्ण स्पर्धेवर नजर टाकल्यास त्यांनी एकही सामना न गमावता जेतेपद पटकावले. समोर आॅस्ट्रेलिया असो किंवा इतर भारतीयांनी जबरदस्त खेळ केला. ज्याप्रकारे भारताने उपांत्य सामन्यात पाकिस्तानला ६९ धावांत बाद केले, त्यावरून भारत आणि इतर संघातील फरक कळून येतो. तसेच यावरून हेही सिद्ध होते की भारतातील क्रिकेटचा स्तर किती उंचावला आहे. याच कारण म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत क्रिकेटने हातपाय पसरले आहेत. गुणवत्ता ठासून भरली असून ही सर्व गुणवत्ता एकत्रित आणून संघ बनवण्याची कामगिरी बीसीसीआयने केली आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये प्रशिक्षक आणि मेंटॉर राहुल राहुल द्रविड यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. तरी सर्वांत आधी विश्वविजेतेपदाच्या शुभेच्छा कर्णधार पृथ्वी शॉ आणि त्याच्या संघाला द्यावे लागेल. कारण, जेव्हा कधी सहजपणे संघ जिंकत असतो, तेव्हा अनेकदा खेळाडू निष्काळजीपणे खेळतात किंवा अतिआत्मविश्वस त्यांच्या खेळात दिसून येतो. पण या स्पर्धेत तसे कुठेही जाणवले नाही. अंतिम सामन्यातही २१७ धावा पाहिजे असताना, कोणीही अतिआक्रमक खेळ करुन विकेट फेकली नाही. आखलेल्या नियोजनांची योग्य अंमलबजावणी करत युवांनी जेतेपदाला गवसणी घातली.खेळाडूंसह राहुल द्रविडच्या योगदानाचेही महत्त्व लक्षात घ्यायला गेलेच पाहिजे. चौथ्यांदा भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक पटकावला असल्याने याआधीच्या संघांनीही चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद कैफपासून उन्मुक्त चंद यांनी आपली छाप पाडली आहे. पण, राहुल द्रविडचे योगदान मोलाचे आहे. पहिले म्हणजे त्याने स्वत:हून १९ व २५ वर्षांखालील संघासोबत जुळण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनण्याची त्यांची इच्छा नव्हती. यामागचे कारण म्हणजे, त्यांच्याकडे वेळेची कमतरता होती. त्यांना आपल्या परिवारालाही वेळ द्यायचा होता, त्याचबरोबर युवा खेळाडूंसाठी योगदान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. हा एक खूप महत्त्वाचा आणि आदरयुक्त निर्णय होता. तांत्रिकदृष्ट्या राहुलची विचारसरणी नक्कीच महान आहे, त्यात वाद नाही. पण त्याहून मोठे म्हणजे क्रिकेटमधील असलेला पैसा आणि प्रसिद्धीपासून युवा खेळाडूंना काहीसे दूर राखण्यात राहुलचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. माझ्या मते राहुलमुळे १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेटला झालेला हा एक मोठा फायदा आहे.(संपादकीय सल्लागार)