नवी दिल्लीः भारताचा माजी कर्णधार आणि जगज्जेत्या अंडर-१९ टीम इंडियाचा 'महागुरू' राहुल द्रविडच्या नावाची शिफारस मानाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी करण्यात आली असतानाच, 'द वॉल'विरोधात बीसीसीआयमधील एक फळी सक्रिय झाली आहे. द्रविडला प्रशिक्षकपदाचा पुरेसा अनुभव नसल्याचा मुद्दा मांडत, तो पुरस्कारासाठी पात्र नसल्याचं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
संकटसमयी टीम इंडियाला भक्कम आधार देणारा, 'द वॉल'सारखा भक्कम पाय रोवून उभा राहणारा राहुल द्रविड आता क्रिकेटमधील नवी पिढी घडवण्याचं मोठं काम करतोय. आधी भारत-अ संघाला तंत्र-मंत्र शिकवणारा द्रविड आता १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय. त्याच्या मार्गदर्शनाखाली २०१६च्या वर्ल्ड कपमध्ये यंग टीम इंडिया अंतिम फेरीत धडकली होती, तर २०१८ मध्ये द्रविडच्या शिष्यांनी वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. ही यशोगाथा लक्षात घेऊनच, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं द्रविडच्या नावाची शिफारस 'द्रोणाचार्य' पुरस्कारासाठी केलीय. मात्र, द्रविडला या पुरस्कार मिळाल्यास तो बऱ्याच गुरूंवर अन्याय ठरेल, असं काही अधिकाऱ्यांचं मत आहे.
विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम त्यांच्या प्रशिक्षकांनी केलंय. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, केवळ तीन वर्षांचा अनुभव असलेल्या द्रविडला द्रोणाचार्य पुरस्कार देणं म्हणजे क्रूर चेष्टाच ठरेल, असं बीसीसीआयमधील एका वर्गाचं म्हणणं आहे. शिखर धवनसारखे 'गब्बर' खेळाडू घडवणारे तारक सिन्हा किंवा वीरेंद्र सेहवागसारखा वीर देशाला देणारे ए एन शर्मा आजही सचोटीने, निष्ठेने तरुणांना क्रिकेटचं तंत्र शिकवताहेत. ते आजघडीला द्रविडपेक्षा नक्कीच महान आहेत. कदाचित भविष्यात द्रविड त्यांना मागे टाकेल, पण आत्ता तरी या पुरस्कारासाठी त्याचं नाव योग्य नाही, याकडे एका अधिकाऱ्यानं लक्ष वेधलं. आता द्रविडच्या नावाबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेतं, हे पाहावं लागेल.
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाची शिफारस खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.