samit dravid six : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. द्रविड यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले. त्यांचा मोठा मुलगा समित द्रविडही क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द घडवत आहे. समित द्रविडने कर्नाटकात होत असलेल्या महाराजा ट्रॉफी KSCA T20 या क्रिकेट लीगसाठी म्हैसूर वॉरियर्सचे तिकीट मिळवले अन् आपली चमक दाखवण्यास सुरुवात केली. KSCA T20 लिलावात म्हैसूर वॉरियर्सने द्रविड यांच्या लेकावर बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात घेतले. समित द्रविडने मारलेल्या एका षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरे तर म्हैसूर वॉरियर्सने मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज समित द्रविडला ५० हजार रुपयांत आपल्या संघाचा भाग बनवले.
समितने भारताचे माजी कर्णधार आणि त्याचे वडील राहुल द्रविड यांच्या शैलीत षटकार मारून सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा हा शॉट पाहून समालोचकांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. या सामन्यात समित मोठी खेळी करू शकला नसला तरी त्याच्या या शॉटने सर्वांना आकर्षित केले. समित द्रविड केवळ सात धावा करून बाद झाला.
दरम्यान, समित द्रविड कूचबिहार ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्नाटक अंडर-१९ संघाचा भाग होता. मागील हंगामातील उपविजेत्या म्हैसूर वॉरियर्सच्या संघाचे कर्णधारपद करुण नायरकडे आहे. वॉरियर्सचा कर्णधार नायरला फ्रँचायझीने रिटेन केले होते.
म्हैसूर वॉरियर्सचा संघ - करुण नायर (कर्णधार), कार्तिक सीए, मनोज भंडारी, कार्तिक एसयू, सुचित जे, गौतम के, विद्याधर पाटील, व्यंकटेश एम, हर्षिल धर्मानी, गौतम मिश्रा, धनुष गोडा, समित द्रविड, दीपक देवदेव, सुमित कुमार, स्मयन श्रीवास्तव, जास्पर ईजे, प्रसिद्ध कृष्णा , मोहम्मद सरफराज अश्रफ.