राहुल द्रविडचा मुलगा समितनं गुरुवारी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील आंतर विभागीय स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली. उपाध्यक्षीय एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समितनं फलंदाजीत 201 आणि नाबाद 94 धावांची खेळी केली. शिवाय त्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या तीन फलंदाजांनाही माघारी पाठवले.
समितनं पहिल्या डावात 250 चेंडूंत 22 चौकार लगावताना 201 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर उपाध्यक्षीय एकादश संघानं 7 बाद 372 धावा केल्या. श्रेयस मोहंतीनं 78 धावा करताना समीतला साथ दिली. प्रत्युत्तरात धारवाड विभागीय संघाचा पहिला डाव 124 धावांवर गडगडला. समितनं 26 धावांत 3 विकेट घेत संघाच्या वाटचालीत मोठा वाटा उचलला. दुसऱ्या डावातही समितची बॅट चांगलीच तळपली. त्यानं नाबाद 94 धावा केल्या. समीतच्या या कामगिरीमुळे उपाध्यक्षीय एकादश संघानं तीन गुणांची कमाई केली.
जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास राहुल द्रविडच्या NCAचा नकार
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरत आहे. तो भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) बुमराहच्या तंदुरुस्तीची चाचणी होणे अपेक्षित होते. पण, राहुल द्रविड अध्यक्ष असलेल्या NCAनं 26 वर्षीय बुमराहची तंदुरुस्त चाचणी घेण्यास नकार दिला आहे. सप्टेंबर महिन्यात बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली होती. त्यानंतर त्याला तीन मालिकांना मुकावे लागले आहे.
वृत्तानुसार, बुमराहच्या दुखापतीची माहिती NCA ला नाही. त्यानं सर्व उपचार वैयक्तिकरीत्या केले आहेत. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत त्यानं त्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. NCAनं तंदुरुस्ती चाचणी घेतल्यास आणि भविष्यात त्याला काही समस्या जाणवल्यास NCA वर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास द्रविडचा नकार असल्याचे समजते.
दरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यासंदर्भात द्रविडशी चर्चा करणार आहेत. ते म्हणाले,''यामागे नक्की काय कारण आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. NCAनं सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्राधान्य दिले पाहिजे. मी द्रविडची भेट घेईन आणि योग्य तो तोडगा काढीन.''
Web Title: Rahul Dravid's Son Samit Scores Double-century In KSCA U-14 Inter-zonal Tournament
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.