नवी दिल्ली : ‘राहुल द्रविड ज्यावेळी खेळायचे तेव्हा सुरक्षित फटकेबाजी आणि अभेद्य भिंतीसारखी त्यांची खेळायची असायची. टीम इंडियाचे प्रशिक्षण ही नवी जबाबदारीही ते अधिक भक्कमपणे पेलू शकतील,’ असा विश्वास माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बुधवारी व्यक्त केला.
भारताकडून खेळणाऱ्या सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक द्रविड हे शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहेत. एका कार्यक्रमात याविषयी गावसकर म्हणाले, ‘राहुल खेळायचे तेव्हा आम्हाला वाटायचे की जोपर्यंत ते क्रीजवर आहेत तोपर्यंत भारतीय फलंदाजी सुरक्षित आहे. त्यामुळेच त्यांच्यावर आलेली मुख्य प्रशिक्षकाची नवी जबाबदारी ते चांगल्याप्रकारे पार पाडतील, असा मला विश्वास आहे.’भारतीय क्रिकेटमध्ये बदलाला सुरुवात झाली असून आता रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ही जोडी संघाला पुढे नेण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीकडून क्रिकेटप्रेमींना तसेच क्रिकेटविश्वातील तमाम जाणकारांना मोठ्या आशा आहेत. गावसकर यांनीही टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जोडीबाबत प्रतिक्रिया दिली.
‘दोघे एकमेकांना समजून घेतील’ या दोघांच्या स्वभावात खूप साम्य आहे, त्यामुळे त्यांचे बाँडिंग चांगले राहण्याची अपेक्षा आहे. ‘तुम्ही दोघांच्या स्वभावांवर नजर टाकली तर ते खूप समान आहेत. रोहित राहुल द्रविडसारखाच शांत आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजून घेतील, असे मला वाटते. - सुनील गावसकर