Rahul Gandhi, Indian Cricket: भारतीय संघाची आशिया चषकातील कामगिरी फारशी उल्लेखनीय नव्हती. पहिल्या फेरीतील दोन्ही सामने जिंकणाऱ्या भारताला सुपर-४ च्या फेरीत सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले. आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंका अशा दोघांनीही भारताला मात देत स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. त्यानंतर आता भारतीय संघ आजपासून ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन टी२० सामन्यांची मालिका खेळतोय. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळण्यात येणार आहे. या दोन मालिकेनंतर होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अग्निपरीक्षेसाठी टीम इंडियाच जोशाने तयारी करत आहे. तशातच रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल यांसारखे मातब्बर फलंदाज असतानाही काँग्रेसचे वरच्या फळीत नेते राहुल गांधी हे T20 World Cup मध्ये ओपनिंग फलंदाजी करणार असल्याच्या एका व्हिडीओने चांगलाच हंगामा केला आहे.
नक्की काय आहे प्रकार-
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने नुकताच टी२० विश्वचषकासाठी संघ जाहीर केला. या संघात इशान किशन किंवा ऋतुराज गायकवाड यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत रोहित शर्मा किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी एखाद्याला दुखापत झाली तर सलामीला कोण येणार? असा सवाल पत्रकारांनी रोहित शर्माला विचारला होता. त्यावर रोहित म्हणाला होता की विराटला आम्ही ओपनिंगचा तिसरा पर्याय म्हणून पाहतोय. या संदर्भातील बातमी एका न्यूज चॅनेलवर देण्यात येत होती. बातम्या सुपरफास्ट वेगाने सांगितल्या जात असल्यामुळे चुकून न्यूज अँकरने लोकेश राहुल ऐवजी राहुल गांधी यांचे नाव घेतले. पाहा व्हिडीओ-
नेटकऱ्यांनी ही चूक लगेच पकडली. याबद्दलचा व्हिडीओ अतिशय वेगाने व्हायरल झाला. लोकांनी त्यावर काही मजेशीर कमेंट्सदेखील केल्या. काही वेळा वेगाने बातम्या देण्याच्या वेळी अशाप्रकारची गल्लत होते, पण त्यावरून एखाद्याला व्यक्तीच्या कामाचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे अशी अतिशय संयमी प्रतिक्रिया अनेक युजर्सने दिली.