Join us  

राहुल जखमी, कसोटी मालिकेतून ‘आऊट’; सूर्यकुमार यादवचा भारतीय संघात समावेश

बीसीसीआयने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नसून पुढील महिन्यात द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 9:34 AM

Open in App

कानपूर : भारताचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुल याच्या डाव्या पायाच्या जांघेचे स्नायू ताणले गेल्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी सुरू होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही.  इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघाचा सदस्य राहिलेला सूर्यकुमार यादव याचा राहुलच्या जागी समावेश करण्यात आला आहे.बीसीसीआयने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नसून पुढील महिन्यात द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होणार आहे. राहुल हा आज ग्रीनपार्कवर झालेल्या पहिल्या सराव सत्रातही सहभागी झाला नाही. अन्य सर्वच खेळाडूंनी सराव केला. पुजारानेदेखील फलंदाजीचा सराव केला. सूर्यकुमारला दोनपैकी एका सामन्यात मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभमन गिल हा मयंक अग्रवाल याच्यासोबत सलामीला फलंदाजी करू शकतो.

तिन्ही प्रकारात खेळतो राहुल२९ वर्षांच्या राहुलने यंदा इंग्लंड दाैरा केला. त्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात तो सहभागी झाला. पाठोपाठ टी-२० विश्वचषकातही खेळला. आता नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघात तो महत्त्वाचा खेळाडू होता. इंग्लंड दौऱ्यात त्याने  आठ डावांमध्ये एक शतक आणि अर्धशतकासह ३१५ धावा केल्या होत्या. ४० कसोटीत त्याने  २३२१ धावा केल्या असून १९९ ही त्याची सर्वोच्च खेळी. 

विराट-रोहितच्या अनुपस्थितीने धक्कान्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली आहे.  आता राहुलचे जखमी होणे संघासाठी मोठा धक्का मानला जातो. विराट हा मुंबईतील दुसऱ्या कसोटीत मात्र संघात दाखल होणार आहे.पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघअजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

रहाणे लवकरच सूर गवसेल!कानपूर येथे भारताचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेकडूनही गेल्या अनेक सामन्यांत मोठी खेळी झालेली नाही. याविषयी पुजारा म्हणाला की, ‘रहाणे एक महान खेळाडू आहे. पण अनेकदा असे होतं की खेळाडू कठीण काळातून जातो. हा खेळाचाच एक भाग आहे. त्यामुळे या उतार-चढावाच्या काळातही मला पूर्ण विश्वास आहे की लवकरच रहाणेकडून मोठी खेळी पाहण्यास मिळेल. तो यापासून केवळ एका डावाने दूर आहे. शतक किंवा मोठ्या खेळीने तो आपली लय पुन्हा मिळवेल.’ 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार अशोक यादवभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App