Ranji Trophy 2024 (Marathi News) : भारतीय संघाने केप टाऊन कसोटी गाजवल्यानंतर आजपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरूवात झाली आणि पहिल्याच दिवशी विक्रमी खेळी पाहायला मिळाली. हैदराबाद विरुद्ध नागालँड यांच्यातल्या सामन्यात राहुल सिंग गहलौत ( Rahul Singh Gahlaut ) याने द्विशतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाने झळकावलेले हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. रवी शास्त्री यांच्या नावावर वेगवान द्विशतकाचा विक्रम आहे.
फलंदाजीला आलेल्या हैदराबादचा सलामीवीर के रोहित रायुडू ( २) लगेच माघारी परतला. करण तेवातियाने ही विकेट मिळवून दिली. तन्मय अग्रवाल व राहुल सिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी २०३ चेंडूंत २२१ धावांची भागीदारी करून हैदराबादच्या डावाला मजबूती दिली. तन्मय १०९ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ८० धावांवर बाद झाला. पण, राहुलची फटकेबाजी सुरू राहिली. त्याने १४३ चेंडूंत द्विशतक झळकावले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरे वेगवान द्विशतक ठरले. रवी शास्त्री यांनी मुंबईसाठी १२३ चेंडूंत द्विशतक झळकावले होते.
राहुलने १५७ चेंडूंत २३ चौकार व ९ षटकारांसह २१४ धावा केल्या. त्याच्या विकेटनंतर तिलक वर्मा व चंदन सहानी यांनी डाव सावरला आहे. तिलक ६६ धावांवर, तर चंदन २३ धावांवर खेळतोय.