मुंबई: ‘दिग्गज महेंद्रसिंग धोनी याचे यष्टीमागील स्थान घेण्यासाठी मनावर मोठे दडपण असते. चाहत्यांच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. अपेक्षापूर्ती करू शकणार की नाही, याबाबत मनात सारखी धाकधूक सुरू असते,’ असे मत युवा यष्टिरक्षक-फलंदाज लोकेश राहुल याने व्यक्त केले आहे.धोनीने २०१४ ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातील पराभवानंतर त्याने एकदिवसीय सामनादेखील खेळलेला नाही. दुसरीकडे राहुलने यंदा जानेवारीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान यष्टिरक्षणाची भूमिका बजावली. न्यूझीलंड दौऱ्यातही त्याला यष्टीमागे ही जबाबदारी स्वीकारावी लागली होती.राहुल म्हणाला, ‘मी देशासाठी यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळताना कमालीचा नर्व्हस होतो. धोनीचे स्थान घेतल्यानंतर चुका झाल्या तर धोनीचे स्थान तुम्ही घेऊ शकत नाही, अशी टीका होते. धोनीसारख्या दिग्गज खेळाडूचे स्थान घेण्याचे दडपण वेगळेच आहे. यष्टिरक्षक या नात्याने आपण धोनीच्या भूमिकेला न्याय देऊ शकतो काय, असा प्रश्न स्वत:ला वारंवार विचारत असतो.’ आतापर्यंत ३२ वन डे आणि ४२ टी-२० सामने खेळलेला राहुल पुढे म्हणाला, ‘यष्टिरक्षण हे माझ्यासाठी नवे काम नाही. आयपीएलसाठी तसेच रणजी करंडकात मी कर्नाटकसाठी ही जबाबदारी सांभाळली आहे. तो पुढे म्हणाला, ‘ज्यांना क्रिकेट माहिती आहे, ते जाणतात की मी नेहमी ही भूमिका बाजावत असतो. गरज ओळखून मी नेहमी जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज असतो.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- यष्टीमागे धोनीचे स्थान घेण्यासाठी दडपण- राहुल
यष्टीमागे धोनीचे स्थान घेण्यासाठी दडपण- राहुल
अपेक्षापूर्ती करू शकणार की नाही, याबाबत मनात सारखी धाकधूक सुरू असते,’ असे मत युवा यष्टिरक्षक-फलंदाज लोकेश राहुल याने व्यक्त केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 3:29 AM